पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. अनेक पक्षांचे नेते मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा हादरा बसणार आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश पाटील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजते. याशिवाय पेणच्या शेतकऱ्यांचे नेतेही भाजपचे कमळ हातात घेण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर त्यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरू होणार आहे. मनसेचे रुपेश पाटील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
पेण तालुक्यातील मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश पाटील कार्यकर्त्यांसह लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. ते १०-१२ वर्षांपासून मनसेत सक्रीय आहेत. रायगड जिल्ह्यात मनसे वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. गोरगरिबांची अडकलेली कामे पाटील यांच्यामार्फत मार्गी लागत होती. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते प्रामाणिकपणे करतात. मात्र हाच युवा नेता मनसेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष बदलणार आहे. काही वर्षांपासून मनसेमधील पक्षांतर्गत गटबाजी वाढल्यामुळे राज्यातील अनेक नगरसेवक, नेते आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. आता याच कारणामुळे रुपेश पाटील हेही लवकरच पक्ष बदलणार असल्याची माहिती मिळते. पेण तालुक्यातील आगरी समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मनसेला बसणार आहे. काही महिन्यांपूर्वी मनसे युवा नेते अमित ठाकरे पेण दौऱ्यावर आले होते. त्यांच्या महाकाली हॉल येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकांनी पक्षात गटबाजी असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर तोडगा काढण्यात पक्षश्रेष्ठी अपयशी ठरले असल्याचे रुपेश पाटील यांच्या निर्णयाने स्पष्ट होते.
मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त रुपेश पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व मान्य करत ४० आमदार आणि १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापचे नेतेही त्यांचे नेतृत्त्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पेणमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे.