तिरुअनंतपुरम: एका उंदराने कोर्टातील वकिलांना सुद्धा हैराण करून टाकलंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलंय. ज्यात उंदराने आरोपीच्या विरोधात असलेला पुरावाच खाऊन टाकलाय आणि हा पुरावा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्क गांजा हा आहे. विश्वास बसत नाहीये ना? मग वाचा सविस्तर प्रकरण
ही घटना तिरुअनंतपुरम येथील न्यायालयाची आहे. डिसेंबर २०१६ पासून एका व्यक्तीवर गांजा बाळगल्याप्रकरणी खटला सुरू होता. साबू असे आरोपीचे नाव असून त्याला तिरुवनंतपुरम कॅन्टोन्मेंट पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडे सापडलेला गांजा तपासण्यासाठी पाठवण्यात आला होता तर काही गांजा तिरुअनंतपुरम मॅजिस्ट्रेट कोर्टात पुरावा म्हणून ठेवण्यात आला होता.
मात्र खटल्याची वेळ आली तेव्हा गांजाची पिशवी रिकामी होती. हा गांजा उंदरांनी खाल्ला होता. उंदरांनी गांजा खाल्ल्याचे उघड झाल्यानंतर पुरावा नष्ट झाल्याने कोर्टात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर वकील आणि स्वतः न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले आहेत.
जो गांजा आरोपींच्या विरोधात सबळ पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाणार होता तो चक्क उंदरांनी खाऊन टाकला. आता पुराव्यांअभावी या प्रकरणात काय निर्णय होणार हे येणाऱ्या काळात समजेल.