मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंनी आपल्याला धमकी दिली, असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. १२ आमदारांची नियुक्ती तुम्ही का केली नाहीत? असे जेव्हा कोश्यारी यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, कुणालाही सांगितले नाही ते तुम्हाला सांगतो. मी पदावरून जाईपर्यंत त्या पत्रावर सही केली नाही. कारण, त्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मला पत्रातून धमकीच दिली होती.
१२ आमदारांची नियुक्ती पंधरा दिवसांच्या आत किंवा त्याच्याही आधी करा, अशी धमकीच देण्यात आली होती. राज्यपाल हा काही राज्याचा रबरस्टँप नसतो. पाच ओळींचे पत्र लिहिले असते तरीही मी त्यांची मागणी मान्य केली असती. मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ राज्यपालांची नियुक्ती केली नाही, असे कोश्यारी यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, सारखं सारखं हे सांगितले जाते की पहाटेचा शपथविधी, रातोरात सगळं ठरलं, ते म्हणणे चुकीचे आहे. कारण तो सकाळचा शपथविधी होता. जर अजित पवार माझ्याकडे आमदारांच्या सह्या असलेले पत्र घेऊन येतात आणि हे सांगतात की आम्हाला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे, तर मग मी काय करायला हवं होतं? देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार हे देखील सांगितले. सकाळीच शपथविधी करायचा हे अजित पवारांनी सांगितले. मी हो म्हटलं. त्यात काय चुकीचं आहे?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही सांगितले होते की, आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे. मी त्यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले. त्यानंतर ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांची मुदत कमी केली तेव्हा त्यांचे सरकार पडले, असेही भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की, त्यांनी मला महाराष्ट्राचे राज्यपालपद दिले होते. तसेच महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप प्रेम दिले. जे काम मी करतो ते जनहितासाठी करतो. वाद-विवाद काही बोललो नसतो, तरीही झालेच असते. मी कुठल्याही वादावर प्रतिवाद केला नाही. माझ्या सीमा मला माहीत आहेत. मी माफी मागण्यासाठी कधीही मागेपुढे पाहिले नाही, असेही माजी राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले़