नाशिक (प्रतिनिधी) : भावाचा मृत्यू झाल्यामुळे वृद्ध दाम्पत्याला भूत आणि भुताळीण समजून नात्यातीलच नागरिकांनी बेदम मारहाण करण्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळीचा पाडा येथे घडली. या प्रकरणाचा तपास गंभीरतेने करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून देण्यात आलेली सविस्तर माहीती अशी की, पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरात मधील मोहपाडा येथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र – तंत्र, जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा अंधश्रद्धेतून आरोप भाऊबंदकीतील काही जणांनी केला. त्यातून चिडून जाऊन त्यांनी भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना जबर मारहाण केली. त्यामुळे भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली आणि भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर मुकामार लागला .
यानंतर कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊतमाळे यांने जखमी अवस्थेत वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस स्टेशनला आणले. त्यावेळी अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली. हरसुल पोलिसांमध्ये तेलवडे या वृद्ध दांपत्याला जबर मारहाण केल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्याच भाऊबंदीतील काही जणांच्या विरोधात दाखल झाला. मात्र इतर कलमांसह जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे आवश्यक होते. ते मात्र हरसुल पोलिसांनी लावले नसल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. या वृद्ध दापत्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.