केंद्रीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे जनतेला केले आवाहन
कणकवली (प्रतिनिधी): प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळवून देण्याची क्षमता माझ्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामध्ये आहे. दोनशे लक्ष कोटी रुपयापर्यंतचे कर्जरोखे उद्योग व्यवसायासाठी एमएसएमईच्या प्रत्येक विभागातून मिळू शकेल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने प्रगतीची स्वप्ने पहावीत. उद्योजक बनण्याची स्वप्ने पहावीत.विकासाचा विचार आत्मसात करावा. मी उद्योजक बनणार, दुसऱ्यांना रोजगार देणार असा निर्धार करा आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी स्वीकारतो. माझा खात्यातील प्रत्येक विभाग तुमच्या तत्पर सेवेसाठी हजर असेल.तुम्हाला व्यवसाय उद्योग उभा करूनच देऊ, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने येथील उपजिल्हा रूग्णालयासमोरील भव्य शामीयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शन उद्घाटन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला उद्घाटनप्रसंगी याप्रसंगी क्वॉयर बोर्डाचे चेअरमन डि.कप्पूरामू, एमएसएमई चे अतिरिक्त सेक्रेटरी डॉ. रजनिज, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, एमएसएमई चे सेक्रेटरी बी.बी. स्वीमी, अनुजा बापट, डॉ.मिलींद कांबळे, बी.बी.सोयन, एमएसएमई चे मुंबई डिएफओए आर गोखे अडिशनल डेव्हलपमेंट कमिशनर इशिता त्रीपाठी, श्री विनित कुमार एमएसएमई चे डेव्हलपमेंट अॅण्ड एक्सपोर्ट प्रमोशन सुषमा मोरथानिया, श्रीमती मोनिका बाही, एमएसएमई चे चेंबर ऑफ इंडियाचे चेअरमन चंद्रकांत साळुंखे, सेक्रेटरी बी.बी.सोयन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, माणसाला सुखी जीवन जगायचे असेल तर पैसा लागतो आणि हा पैसा मिळवण्यासाठी नोकरी व्यवसाय करणे गरजेचे आहे. नोकऱ्यांची संख्या संपत आल्याने आपण नोकरवर्ग होण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनले पाहिजे आणि म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात नवीन उद्योजक निर्माण करण्याचे काम माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही व्यापक स्वरूपात सुरू केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या जनतेने या योजनांचा लाभ घ्यावा, स्वतःचे घर कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा ते पंधरा लाखाची लोकसंख्या आहे मात्र यातील फक्त १८ हजार लोक उद्योग करतात.ही आकडेवारी भूषणावर नाही. या जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय करणारी संख्या वाढली पाहिजे कोकणी मेव्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. जिल्ह्यात आंबा तयार होतो काजू कोकम जांभूळ आणि अनेक प्रकारचे मासे मिळतात. फळांवर प्रक्रिया करून आणि मासे पॅकिंग करून ते एक्स्पोर्ट केल्यास खूप मोठा व्यवसाय याच ठिकाणी होऊ शकतो मात्र ती मानसिकता आपली नाही. उद्योजक होण्यासाठी उद्योगपतीच्याच कुटुंबात जन्माला आले पाहिजे ही गरज नाही.
मी सर्वसामान्यांच्या कुटुंबातला माणूस मंत्री मुख्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री अशा पदांपर्यंत गेलो ह्या मागे कष्ट आहेत. तुम्ही राजकारणात किंवा उद्योग क्षेत्रात ते कष्ट उपसा काही दिवस त्रास होईल मात्र यशाच्या शिखरावर पोहोचणे कठीण नाही.ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची अट नसते तसेच उद्योजक बनण्यासाठी वयाची अट नाही. तुम्ही व्यावसायिक आहात हे तुमच्या मेहनतीवरच अवलंबून असते. पाच लक्ष कोटीचा उद्योग अंबानी टाटा हेच करतील असे नाही आपण सुद्धा ते जिद्द बाळगले पाहिजे. व्यावसायिक अभिसरण स्वतः निर्माण करावे लागेल २००४ आली उद्योगपती अंबानी यांनी ५ जी इंटरनेट सेवा आणि व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा सुरू करणार असे मला सांगितले होते. गेल्या दोन वर्षात आपण पाहतोय की या सेवा सुरू झाल्या म्हणजेच जगाच्या पुढे जाऊन पाहण्याची दृष्टी उद्योजकांमध्ये हवी आणि ती असेल तोच बदलत्या प्रक्रियेत आणि बदलत्या सामाजिक स्थितीत टिकाव धरून राहील. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आधुनिक टेक्नॉलॉजी जगात विस्तारली मात्र या सर्वांमध्ये आपण कुठे आहोत याचाही विचार झाला पाहिजे. जिथे आंबा पिकत नाही तिथून आंबा पॅकिंग करून एक आंबा ५२ रुपयांनी विकला जातो. ज्याची मूळ किंमत शेतकऱ्याला फक्त ६ रुपये मिळते. त्यामुळे उद्योगांचा विचार करा प्रक्रिया आणि निर्मितीच्या कामाला लागा. उद्योजक म्हणून नावारूपास या.नोकरी देणारे उद्योजक बना असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, नारायण राणे यांनी युवकांना उद्योगक्षेत्रात येण्याचे आवाहन केले. ‘युवकांनी नोकऱ्या मागणारे राहण्याऐवजी नोकऱ्या देणारे व्हावे’ असे राणे म्हणाले. सर्व हितसंबंधीयांच्या सक्रिय सहकार्याने, एमएसएमई क्षेत्र, गतिमान आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनू शकते, असेही ते पुढे म्हणाले. एमएसएमई क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून, एमएसएमई क्षेत्रातील योजनांविषयी जनजागृती होईल आणि त्यातून युवकांना, स्वयंरोजगरांची प्रेरणा मिळेल, परिणामी ‘आत्मनिर्भर भारताच्या’ उभारणीला बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध उद्योग प्रदर्शकांशी संवाद
दरम्यान ना.राणे आणि मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन, विविध उद्योग प्रदर्शकांशी संवाद साधला. या प्रदर्शनात, वस्त्रोद्योग, हर्बल उत्पादने, चामडयाच्या वस्तू, आणि नारळाच्या काथ्याची उत्पादने अशा अनेक लघुउद्योजकांनी आपले स्टॉल्स लावले आहेत. या कार्यक्रमादरम्यान, उद्यम असिस्ट पोर्टल अंतर्गत सहाय्यित असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म उपक्रमांना, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्रा(NSSH) अंतर्गत अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.सिंधुदुर्ग इथे नव्याने स्थापन झालेली खादी उद्योग संस्था, जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्थेला यावेळी चरखा आणि मागाचे वाटप करण्यात आले. अतिरिक्त विकास आयुक्त, डॉ इशिता गांगुली त्रिपाठी आणि संयुक्त सचिव मर्सी यांनी यावेळी एमएसएमई योजनांचे सादरीकरण केले. त्या म्हणाल्या, घरात आपण सगळ लागल तस आपले रोल बदलतो कोणी आपल्याला शिकवत नाही. आपल्याकडे बल आहे बुद्धी आहे अन् क्षमताही आहे. ती वाढविण्याची गरज आहे. महिलांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मुद्रालोन आहे. प्राईम मिनिस्टर एम्प्लायमेंट जनरेशन प्रोग्रॅम आहे. अगदीच नाहीतर स्टार्ट अप इंडियाचा आधार घेऊ शकतो. आपल्या देशात पैसा आहे. तुम्ही त्यांना अपलोड करण्याची गरज आहे. तुम्ही त्याच्याकडे जाण्याची गरज असल्याचे सांगून सुषमा मोरथानिया यांनी उद्योजक बनण्याचे आवाहन केले.