- कथा: रमेश तांबे
संध्याकाळची वेळ होती. मोती कुत्रा दरवाजात बसला होता. दिवसभर घराची राखण करून तो आळसावला होता. थोडासा झोपेत, थोडासा आळस देत होता. तेवढ्यात कसलासा आवाज आला. मोती पटकन उठून उभा राहिला. खाली पडलेले त्याचे कान एकदम उभे राहिले. काय घडले? कुठे घडले? याचा तो अंदाज घेऊ लागला. तेवढ्यात दोन माणसे रस्त्याने जाताना त्याला दिसली. त्यांची नजर भिरभिरत होती. ते दबक्या चालीने भरभर चालत होते. मोतीला शंका आली. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता मोती उठला अन् हळूहळू त्यांच्या मागे-मागे जाऊ लागला. त्या माणसांच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे होते. ते चालताना काहीतरी कुजबूजत होते. त्या दोघांच्याही हातात पिशव्या दिसत होत्या. त्यांनी त्या अशा धरल्या होत्या की, त्यात काही मौल्यावान गोष्टी असाव्यात.
आता मोती सावकाशपणे त्यांचा पाठलाग करू लागला. बराच वेळ चालत गेल्यावर ते एका घरात शिरले. घरात शिरताना आपल्याला कुणी बघत तर नाही ना याची खात्री करून घेतली. ते घर दोन मजली होते. छपरावर लाल रंगाची कौले होती. घराचे दरवाजे पांढऱ्या रंगांनी रंगवलेले होते. समोर एक पिंपळाचे झाड होते. साऱ्या खुणा मोतीने लक्षात ठेवल्या. परत परत पाहिल्या अन् मग तो माघारी फिरला अन् थेट पोलीस स्टेशनमध्येच शिरला. पण कुत्रा आत आल्याचे समजताच पोलिसांनी मोतीला हाकलून लावले. मोतीला बोलता येत नव्हते अन् पोलिसांना काही कळत नव्हते. जवळ-जवळ तासभर मोतीने पोलीस स्टेशनसमोर कुई कुई भू-भू आवाज केले. पण मोतीची सारी मेहनत वाया गेली. वर पोलिसांनी त्याला दोन-तीन दगड फेकून मारले. त्याने ते शिताफीने चुकवले. आता काय करावे, या विचारात मोती असतानाच साहेब आले. समोरच उभ्या असलेल्या मोत्यावर त्यांचे लक्ष गेले. त्यांना त्या मोतीत काहीतरी विशेष वाटले. म्हणून ते चटकन त्याच्या जवळ आले. तसा मोती उठला अन् साहेबांच्या पायाला अंग घासू लागला. साहेब खाली वाकून मोतीच्या अंगावरून हात फिरवू लागले. त्यांनी मोतीचे तोंड दोन्ही हाताने पकडले अन् त्याच्या डोळ्यांत बघितले. साहेबांना कदाचित कुत्र्यांविषयी ज्ञान असावे. त्यांनी लगेच पोलिसांना मोहिमेवर निघण्याचा आदेश दिला.
मग काय दहा-बारा पोलिसांचा फौज फाटा घेऊन साहेब निघाले. मोती मात्र सर्वांच्या पुढे होता. साहेब मोतीपासून ठरावीक अंतरावर चालत होते. रस्त्यावरची माणसं पोलिसांकडे आश्चर्याने बघत होती. खरे तर दोन दिवसांपूर्वीच गावात एक मोठी चोरी झाली होती. लाखोंचा ऐवज चोरीला गेला होता. पण चोरांचा काहीच पत्ता लागला नव्हता. थोड्याच वेळात मोत्या एका दोन मजली कौलारू घरासमोर उभा राहिला. साहेबांनी लगेच ओळखले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घराला वेढा घालण्याच्या सूचना दिल्या अन् स्वतः पुढे जाऊन दरवाजा ठोठावला. पण हूं नाही की चूं नाही. पुन्हा एकदा साहेबांनी दरवाजाची कडी जोरजोरात वाजवली. तेव्हा एका बाईने दरवाजा उघडला. समोर पोलीस दिसताच बाई जोरात ओरडली, “पळा पळा पोलीस आले, पोलीस आले.” दरवाजातल्या बाईला बाजूला सारून साहेब आपल्या चार-पाच सहकाऱ्यांसह आत शिरले. मग पुढची दहा-पंधरा मिनिटे घरातून आरडाओरडा, हाणामारी, किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते. थोड्या वेळानंतर पोलिसांनी दोघांना हातात बेड्या घालून घरातून बाहेर काढले. रस्त्यावर बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. चोरांना बघताच गर्दीची कुजबूज वाढली. पोलिसांनी चोरांना मुद्देमालासह रंगेहात पकडले होते. गावकऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. साहेब मात्र मनोमन मोतीला धन्यवाद देत होता. पुढे चोरांना रितसर शिक्षा झाली.
अरे, पण आपल्या मोतीचे पुढे काय झाले! मित्रांनो, साहेबांनी मोतीच्या कामगिरीवर खूश होऊन त्याला पोलीस खात्यात कामाला ठेवले. त्याचे राहाणे, खाणे-पिणे आता पोलीस स्टेशनमध्येच असते. पुढे कितीतरी वर्षं मोतीने अनेक चोर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आपला मोती अनोख्या कामगिरीने गावाचा आदर्श बनला होता!