- स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
नमू म्हणजे मैत्रीचा धागा. एकच मैत्रीण. सारं सुख-दुःख शेअर करताना ती आणि नमू कधीच थकलेल्या नाहीत. नमूच्या घरी ती एक-दोनदा जाऊन आलेली. ओळख चांगलीच झालेली तिच्या घरच्यांशी.
नमू तिची कॉलेज मैत्रीण. कधी भांडण नाही की अबोला नाही… अगदी खासमखास असल्यासारखं. ती नेहमी नमूला म्हणायची, ‘मैत्री नेहमी दोघांचीच असली पाहिजे. तिसरं माणूस मधे आलं की, त्याचा विस्कट होतो आणि आपल्या दोघांच्या मैत्रीत तिसरं कुणीच नको.’
तशी नमू हसलेली. म्हणाली, ‘आपल्या दोघांच्या मैत्रीत तिसरं माणूस आहे
बरं का!’
कोण बरं?
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह
‘अद्वैत गं…!’ नमू बोलली
‘कोण अद्वैत?’ तिचा पुन्हा प्रश्न
‘अगं माझा मित्र.’ नमू न
लाजता बोलली.
‘हो का? पण तू यापूर्वी कधी बोलली नाहीस. आपल्यात एवढी खास मैत्री असूनही तू हे
लपवून ठेवलेस.’
‘बोलणारच होते मी… पण अजून कशात काही नाही. म्हणजे तो फोन उचलत नाही माझा. ऐक ना तू कर ना गं त्याला फोन. त्याच्या घरातले सारखे त्याच्या फोनवरच असतात. तो घरातल्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. म्हणून फारसं बोलणंही होत नाही. आई-वडिलांच्या आज्ञेतला मुलगा आहे तो.’ नमू बोलली.
‘हा पण मी नाही असं कुणाशीही फोनवर बोलू शकत. नमू तुझं प्रकरण तूच हाताळ बाई’ ती बोलली.
‘मग कसली आली गं मैत्री. खासमखास?’ नमू चिडली. पण तिने नमूचं बोलणं ऐकलंच नाही. नमूच्या या विषयात न पडण्याचं तिने ठरवलं. मग नमूला राग आलेला काहीसा. रागाने तिने हिच्याशी बोलणं टाळलं. अनेक दिवस नमू आणि ती भेटलीच नाहीत.
पण नंतर नमू जेव्हा तिला भेटली तेव्हा नमूच्या गळ्यात चक्क मंगळसूत्र होतं. हा बदल बघून तिला आश्चर्यच वाटलं.
‘जीवलग मैत्रीण असूनही नमूने आपल्याला लग्नाला बोलावलं नाही याचं तिला दु:ख झालं.’ नमू म्हणाली, ‘तू मला साथ दिली नाहीस. त्यामुळे विवाह हा आमचा आम्हीच उरकला. याचा कुणालाही पत्ता नाही. अद्वैतच्या घरीही माहीत नाही आणि माझ्या घरीही याचा पत्ता नाही.’ नमूचं बोलणं ऐकून ती घाबरलीच. पण नमूने तिला चिडीचूप राहायला सांगितलं.
मग नमू तिच्या माहेरी आणि अद्वैत त्याच्या घरी असं सारं वातावरण राहिलं.
पुन्हा काही दिवसांनी जेव्हा नमू तिला भेटली, तेव्हा तर ती रडवेलीच झालेली. काय झालं या प्रश्नावर नमूकडे उत्तर नव्हतं. पण या विवाहाला अद्वैतच्या घरातून मान्यता नसल्याने अद्वैतने तिला ओळख दाखवायलाही नकार दिला. नमू तिला भेटली तीच केविलवाणी. या अशा प्रकारामुळे नमूला तिच्या घरचेही दरवाजे बंद झाले. म्हणून मग तिचं घर हाच नमूचा आधार.
‘काही दिवसांसाठी येते तुझ्या घरी, थोडा बदल म्हणून नंतर वातावरण निवळलं की जाईन घरी, म्हणून नमूने तिच्या घराचा आधार मागितला. तिने नमूचा विवाह लपवून आईला नमू आपल्या घरी राहायला येत असल्याचं सांगितलं. नमू राहायला आलीही. काही दिवस राहिलीही. नमूचं वागणं-बोलणं नमूच्या आईला फारच रूचलं. मनापासून आवडली नमू तिच्या आईला. नमूचा भाऊ अनिकेत याच्यासाठी नमू कशी वाटते? हा आईचा प्रश्न ऐकून ती जराशी बावरली.ती आईला म्हणाली, ‘आई अगं एका ओळखीत असं कुणाला पारखू नये.’
‘अगं तुझी मैत्रीणच आहे ती, चांगलीच असणार.’
‘पण आई?’ तिने समजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण नमूनेही आईला असं काही आपल्या स्वभावाने जिंकलं की खरं सांगायचा धीर तिला झाला नाही.’
ती बैचेन झाली. नमूचा विवाही अद्वैतशी झाला हे ती कुणाला सांगू शकली नाही. ती नमूला म्हणाली, ‘नमू तू तरी आईला समजावून सांग, तुझा विवाह अद्वैतशी झाला असतानाही ती तुला सुनेच्या रूपात पाहतेय. माझा भाऊ हे सारं जाणत नाही.’ तशी नमू हसली. म्हणाली, ‘तुझ्या आईला मी पसंत आहे, भावाला पसंत आहे, मग प्रश्न कुठे आला? आणि अद्वैतचा माझा विवाह हा संपुष्टात आलाय. तू का अस्वस्थ होतेस?’ नमू उत्तरली
‘तुला काहीच वाटत नाही का गं, अशा वागण्याचं?’
‘मी आता तुझ्या घरात आलीच आहे, आता कशाला बाहेर पडू? बाहेर तर तुला पडायचं आहे. तुझं लग्न झाल्यावर. आईला विचार, तुझ्या आईने तुझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवातही केलीय. सारं कसं सुरळीत होणार आहे. तू फक्त तुझं तोंड बंद करायचं आहेस.’
तिने एकवार आईकडे पाहिलं तर आईचा चेहरा आनंदाने तरळला होता. भाऊही खूशच काहीसा. पण नमूचं वागणं खटकलंच काहीसं. मैत्रीचा असा गैरवापर करून ती आपल्या घरात घुसली याचा तिला खरं तर रागच आला. पण खऱ्याचा अधिक विपर्यास न करता ती चिडीचूप झाली ती कायमचीच.