Sunday, July 14, 2024

सदाफुली

  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

आपण निसर्गाचाच भाग असतो म्हणजे प्रत्येकालाच निसर्गातले काहीतरी आवडतेच! कोणाला नदी – समुद्र – झरे – धबधबे आवडत असतील. कोणाला झाडे आवडत असतील, तर कोणाला पाने-फुले. कोणाला पक्षी – प्राणी – कीटक आणखी काही. तुम्हाला निसर्ग आवडत नसेल तरी निसर्गाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. मी इथे तुमची शाळा घेऊ इच्छित नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला माहीत आहेच की आपण जिथे राहतो ते घर, ज्याच्यावरून चालतो ती पृथ्वी, आपण घेतो तो श्वास, आपण खातो ते अन्न असे सगळेच निसर्गाशी निगडितच असते.

हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे काही कारणास्तव मोजून चार दिवसांसाठी मला घराबाहेर जावे लागले, तेही घराला कुलूप ठोकून आणि मी जेव्हा परतले तेव्हा बेडरूमच्या गॅलरीचे दार उघडले आणि खूप हळहळले. आमच्या सोसायटीमध्ये कोणतीही झाडे लावायची बंदी आहे. आता का ते परत सांगण्याची गरज नाही… पाण्यामुळे बिल्डिंगची खूप हानी होते इत्यादी आणि का होते, कशी होते त्याच्या खोलात परत मला शिरावेसे वाटत नाही. पण, अलीकडे बऱ्याच संस्था आपल्याला कार्यक्रमात फुलांच्या ऐवजी छोट्याशा झाडाच्या कुंड्या देतात. गेल्या पंधरा दिवसांत चार संस्थांनी मला कार्यक्रमात कुंड्या बहाल केल्या. एका कुंडीत तुळशीचे रोप होते, तर एकात कोणत्या तरी औषधी वनस्पतीचे होते. एक गुलाबाचे होते आणि एक सदाफुलीचे. गेले पंधरा दिवस मी त्यांना खूप काळजीपूर्वक एका मोठ्या परातीत ठेवून थोडेसे पाणी घेऊन जगवत होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे माझी मैत्रीण रजनी माझ्या घरातल्या सगळ्याच कुंड्या घेऊन जाणार होती. दरम्यान मला अचानक घराबाहेर जावे लागले आणि यांना पाणी घालण्याची सोय करण्याचे मी विसरून गेले. मी त्या रोपांकडे पाहिले त्यातली सगळी रोपटी पार वाळून गेली होती, मात्र सदाफुलीला पाहिले फूल उमललेले होते. अतिशय सुंदर असा त्याचा पांढरा – गुलाबी रंग आकर्षक होता. फूल जितके टवटवीत होते तितकेच त्याचे झाडही टवटवीत होते. त्याच्याकडे पाहताना मी खूपच आनंदून गेले आणि विचार करू लागले की, माणसांनी सदाफुलीसारखे का असू नये? आपल्याला नेहमीच हवे ते मिळत नाही… अगदी खूप खूप अत्यावश्यक गोष्टसुद्धा! आता या सर्व रोपांना फक्त काही थेंब पाण्याचे आवश्यक होते, पण ते न मिळाल्यामुळे ते सुकून गेले होते. सदाफुलीने कसा काय तग धरला माहीत नाही. पण, या सदाफुलीकडून शिकता आले पाहिजे की, अभावग्रस्त परिस्थितीत तग धरणे. कठीण आहे पण अशक्य नाही. असे जमले तर आपले आयुष्य खूपच सुलभ होऊन जाईल. येथे मला व्हॉट्सअ‍ॅपवर कधीतरी वाचलेल्या कवितेच्या
दोन ओळी आठवताहेत त्या उद्धृत करते आणि थांबते.

सदाफुली सांगते –
रुसून रुसून राहायचे नसते
हसून हसून जगायचे असते!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -