- ऐकलंत का!: दीपक परब
फुलराणी’ म्हटले की, हमखास डोळ्यांसमोर येतो तो भक्ती बर्वे-इनामदार यांचा हसरा, मधाळ, खोडकर आणि करारी चेहरा. मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर २५ पेक्षा जास्त नाटकांमध्ये भूमिका करणाऱ्या भक्ती बर्वे यांच्या कारकिर्दीमधला ‘माइलस्टोन’ म्हणजे ‘ती फुलराणी’ हे नाटक. या नाटकामधील मंजुळेच्या भूमिकेमुळे त्यांची खरी ओळख निर्माण झाली व ती रसिकांच्या मनात कायमची ठसली. २९ जानेवारी १९७५ रोजी म्हणजेच तब्बल ४६ वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला होता. मुळात हे नाटक म्हणजे ती ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आहे. भक्ती बर्वे हयात असेपर्यंत ‘मंजुळा’ हे पात्र त्यांनी साकारलं. मंजुळा म्हणजे भक्ती बर्वे असं जणू एक समीकरणच रसिकांच्या डोक्यात पक्कं बसलं होतं. या नाटकाचे ११११ पेक्षा जास्त प्रयोग करत मंजुळाची भूमिका त्या अक्षरश: जगल्या होत्या. पुढे २००१ साली त्यांचे अपघाती निधन झाल्यावर, काही काळ प्रिया तेंडुलकर यांनी मंजुळाची भूमिका साकारली. त्यांच्यानंतर सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष आणि आता हेमांगी कवी या प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या कसदार अभिनयाने मंजुळा सादर केली. भक्ती बर्वेंची मंजुळा अजरामरच आहे आणि राहील. पण या सर्व गुणी अभिनेत्रींनी आपल्या समृद्ध अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ‘फुलराणी’ कायम जिवंत ठेवली. आता याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
‘फिनक्राफ्ट मीडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री. ए. राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरू ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरू ठाकूर यांची असून संगीत नीलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. येत्या २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे. विशेष म्हणजे ‘फुलराणी’ या चित्रपटात विक्रम राजाध्यक्ष ही मुख्य भूमिका सुबोध भावे साकारणार आहे. या चित्रपटातील एक मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टमधील त्याचा हटके लूक सोशल मीडियावर चर्चेत राहिला, कारण या पोस्टरमध्ये ती सुबोधसोबत पाठमोरी असल्याचे दिसत होते. त्यानंतर ती ‘फुलराणी’ कोण? अशी उत्सुकतारूपी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. सोशल मीडियावर मराठी सेलिब्रिटींनी सुबोध भावेला टॅग करून ‘सुबोध, कोण आहे तुझी फुलराणी?’ असे विचारून भंडावून सोडले होते. अनेकांनी वेगवेगळे अंदाजही बांधले. अखेर फुलराणीची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव पुढे आले आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पाहण्यासाठी सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्या परीने तर्कवितर्क लावत होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून लोकप्रिय झालेली प्रियदर्शिनी इंदलकर ही ‘फुलराणी’च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. प्रियदर्शनीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील ‘बिवली अवली कोहली’ या पात्राला, तर लोकांनी डोक्यावर घेतले आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी भारावून सांगते, पूर्णपणे नवे असे काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीने माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचे वर्तुळ पूर्ण केले. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. ‘प्रियदर्शिनी ते शेवंता’ बनण्याचा आपला अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाल्याचे सांगत ‘फुलराणी’ म्हणजेच प्रियदर्शनी म्हणाली की, खरं तर ‘फुलराणी’सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या एकपात्रीचे ऑडिशन द्यायला मला जेव्हा सांगितले गेले, तेव्हा माझे सिलेक्शन होईल, असे वाटलेच नव्हते. एक तर माझे पाठांतर नव्हते आणि बऱ्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणे हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही ‘फुलराणी’साठी सिलेक्ट होणार नसल्याचे मानून आपल्याला जसे वाटतेय तसं करूया, असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी काॅल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावले गेले. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ. पण फिल्म मिळेल, असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मीटिंगनंतर विश्वाससरांनी मला लाॅक केलं होतं, हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय, हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ‘फुलराणी’ म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत, यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं, असंही प्रियदर्शनी म्हणाली.