Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलआज्ञाधारक सूरज

आज्ञाधारक सूरज

  • कथा: प्रा. देवबा पाटील

सारंगा या छोट्याशा गावी जयराज नावाचे एक जमीनदार राहत होते. त्यांना सूरज नावाचा एक छोटा मुलगा होता. सूरजची आई घरी दररोज नियमितपणे सूरजचा अभ्यास घ्यायची. शाळेतील शिक्षकांचे शिकविणे व आईद्वारे त्या अभ्यासाची पुन्हा तयारी करून घेणे, त्यामुळे त्याच्या बुद्धीची क्षमता वाढत होती. सुबोधच्या अवांतर वाचनाने त्याची कुशाग्रता वाढत होती. तो मन लावून अभ्यास करायचा व वर्गात नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा. अभ्यासात तर त्याचा हातखंडा होताच. पण खेळण्यातसुद्धा तो कधीच मागे नव्हता.

जयराज एके दिवशी संध्याकाळी त्याला म्हणाले, “बाळ सूरज, तू अभ्यासात हुशार व खेळांमध्ये पटाईत आहेस. ही फार आनंदाची बाब आहे; परंतु तू एक गोष्ट करावी”, असे मला वाटते. “बाबा, तुम्ही सांगाल ती गोष्ट करायला मी तयार आहे”, सूरज म्हणाला.
जयराज म्हणाले, “सूरज आता तू दररोज सकाळी लवकर उठून न चुकता प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार, दंड, बैठका, धावणे आदी व्यायाम करीत जा.”
“बाबा, या व्यायामाचा मला काय फायदा होणार?” सूरजने विचारले.
जयराज सांगू लागले, “सकाळी सूर्योदयापूर्वी वातावरणात प्राणवायूचे प्रमाण भरपूर असते. तो आपल्या शरीरातील रक्ताला खूप हितावह असतो. तो आपल्या शरीरात गेल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. प्राणायामामध्ये दीर्घ व संयमित श्वसन करावे लागते. त्यामुळे नेहमीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात प्राणवायू श्वासावाटे आपल्या फुप्फुसांमध्ये जातो. प्राणायामाने त्यांची कार्यक्षमता वाढते व तो प्राणवायू रक्तात मिसळून हृदयाकडे गेल्याने रक्ताचे शुद्धीकरण खूप वेगाने व चांगल्या प्रकारे होते. योगासने व सूर्यनमस्कारांनी आपल्या आतड्यांना व पोटातील इतर अवयवांना योग्य ताण मिळतो. ते आपापली कामे नीट करतात. आतड्यांची पाचकता वाढते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. अन्न नीट पचल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. सूर्यनमस्कारांनी शरीर निरोगी राहते.”

“दंड, बैठका, धावणे या जोरकस व्यायामांनी हातापायांना चांगला व्यायाम घडतो. ते बांधेसूध होतात. आपली कामे करताना ते कधीच कुरकूर करीत नाहीत. नेहमी आपल्याला पुढेच नेतात. या साऱ्या व्यायामांनी मन प्रसन्न राहते. दिवस छान जातो. मनोधैर्य वाढते. तू दररोज नेमाने सकाळी पूजा व रात्री अभ्यासानंतर सुबोध व प्रबोध असे वाचन करतोच. रोजच्या चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने माणसाची सुवैचारिक शक्ती वाढते. नियमित, लयीत व शांततेत केलेल्या पूजेने मनाचे चांचल्य कमी होऊन मानसिक शक्ती वाढते. रोजच्या खेळण्याने माणसाची निर्णयशक्ती वाढून शरीर चपळ बनते, तर व्यायामाने शारीरिक शक्ती वाढते नि शरीर बलवान होते. मग करणार ना रोज सकाळी माझ्यासोबत व्यायाम?” बाबांनी सूरजला विचारले.

“होय बाबा”, सूरज उत्तरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून गच्चीवर बाबांसोबत सूरजचा व्यायाम सुरू झाला. सकाळच्या सुयोग्य व्यायामाने दोन-तीन वर्षांत त्याचे शरीर चांगलेच बळकट व अतिशय चपळ बनले. असाच एका सुट्टीच्या दिवशी तो दुपारच्या वेळी आपल्या शेतात गेला असता त्याच्या संत्र्यांच्या बगिचात एका बाजूस कोणीतरी झाडांना दगड मारीत असल्याचा आवाज आला. तो तिकडे गेला, तर दोन माणसे संत्र्यांच्या झाडांना दगड मारून संत्री खाली पाडताना त्याला दिसली. सूरजने त्यांना त्या संदर्भात हटकले, तर ती एकदम त्याच्या अंगावर धावून आली. पण रोजच्या खेळांनी व व्यायामाने सूरजचेही शरीर आता चांगलेच कसलेले झाले होते. त्यानेही एका क्षणात फटाफट आपल्या ताकदीने त्यांना जबरदस्त ठोसे लगावले व लाथाबुक्क्यांनी जमिनीवर लोळवले. शेवटी दोघांचेही बखोटे धरून त्यांना लाथाबुक्क्यांचा मार देत शेतातील विहिरीवरील झाडांखालच्या ठिय्यावर आणले नि आपल्या वडिलांना आवाज दिला.

त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील व इतरही मजूर ताबडतोब धावतच विहिरीवर आले. जयराज जमीनदारांनी त्या गावगुंडांना ओळखले. पण ते गावातीलच असल्याने त्यांना सोडून दिले. सूरजला व्यायामाचे खरे महत्त्व समजले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -