गेल्या ३०/४० वर्षांत आपल्या देशात, विशेषत: मराठी समाजात प्रचंड बदल झाले आहेत. काही तंत्रज्ञानाच्या प्रभावाने झाले, काही सरकारने शिक्षणाचे माध्यमच परकीय करून टाकल्याने आणि काही बदल भाषिक न्यूनगंडाने पछाडलेल्या मराठी समाजाने ते परकीय माध्यम मातृभाषा म्हणूनच स्वीकारल्याने झाले, तर काही सिनेसृष्टीच्या आणि एकंदर मनोरंजनविश्वाच्या टोकाच्या बेबंद व्यापारीकरणामुळे आणि त्यांना मिळालेल्या बेछूट स्वातंत्र्यामुळे झाले आहेत. याशिवाय काही अगदीच वाईट बदल लोकांनीच स्वेच्छेने भारतीय जीवनमूल्यांचा त्याग करून चंगळवादी, आत्मकेंद्री पाश्चिमात्य जीवनमूल्ये स्वीकारल्यामुळे झाले आहेत.
उदाहरणादाखल आज कुटुंबांचे स्वरूप पाहा. बहुसंख्य कुटुंबात सदस्यसंख्या तीनच्या वर नाही. अशा ठिकाणची लाडोबा मुले चांगले नागरिक बनू शकत नाहीत. त्यांची निकोप मानसिक वाढच होत नाही. खुट्ट म्हटले की, त्यांचे सगळे तंत्र बिघडते. अनेक नवी जोडपी तर मूलच नको या मताची आहेत. आई-वडीलही खरे तर अनेकांना नकोच असतात. आई-वडिलांनी फक्त जन्म देऊन आपल्याला महागड्या शाळेत शिकवून मोठे करून, अमेरिकेसारखे आमच्या जीवनातून निघून जावे अशीच अनेकांची अपेक्षा असते. मग आर्थिक स्थिती बरी असलेले पालक बिचारे स्वत:हूनच म्हणतात, “आपण तुमच्यासाठी गावातच वेगळे घर घेऊ.” मग मुलगी सासरी न जाता मुलगाच मुलीने निवडलेल्या घरात ‘सासरी’ जातो.
सुरुवातीला सर्वांची सोय बघून महत्त्वाच्या सणावाराला आई, वडील, मुलगा आणि सुनेच्या भेटी होतात. एक-दोन वर्षांत हळूहळू त्या भेटीही विविध खऱ्या-खोट्या कारणाने कमी होत जातात आणि कुटुंबसंस्था पहिले मूल होईपर्यंत “सस्पेंडेड अनिमेशनमध्ये” जाते. एकदा सगळे विसरून आजी-आजोबांनी नातवंडाचे संगोपन त्याच्या वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपर्यंत करून दिले की, ती जवळजवळ संपतेच!
अर्थात हे काही सर्वसाधारण चित्र नाही. खेड्यासारखी शहरातही घट्ट नात्यांनी बांधलेली प्रेमळ कुटुंबे आहेत. पण आजच्या मराठी कुटुंबांचे उद्याचे मॉडेल हेच आहे. जिथे अजून मराठी संस्कृती शिल्लक आहे, त्या ग्रामीण भागातही हळूहळू हेच होणार कारण, समाज अनुकरणशील असतो. तो त्याला श्रेष्ठ वाटणाऱ्या कुणाचे तरी अनुकरणच करत असतो. त्यातून तर संस्कृती बदलते, नामशेष होते, पसरते. मागे इंग्रजांचे अनुकरण, मग हिंदी सिनेमाच्या प्रभावाने फिल्मी हिंदी संस्कृतीचे अनुकरण, मग आत्मकेंद्रित नागरी समाजाचे अनुकरण! हेच होत आले! अर्थात या अशा वातावरणातसुद्धा काही ओलसर, रसरशीत, घट्ट नाती सांभाळणारी कुटुंबे बेटासारखी उभी दिसतात. ती टिकतीलही, पण ते अपवाद म्हणून!
या पार्श्वभूमीवर १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या “वाहतो ही दुर्वाची जुडी” या बाळ कोल्हटकर यांच्या लोकप्रिय नाटकातील एक गाणे अनेक हळव्या स्मृती जाग्या करते. कोल्हटकरांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग १९६४ साली झाला आणि प्रेक्षकांनी नाटक अक्षरश: डोक्यावर घेतले. नाटकाच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना आचार्य अत्रे म्हणाले होते, “दुर्वाच्या जुडीइतके यश क्वचितच दुसऱ्या कोणत्या नाटकाला लाभले असेल. मराठी मनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य या नाटकात आहे. प्रत्येक पात्र आपल्या इतक्या परिचयाचे वाटते की, आपण ते कुठेतरी पाहिले आहे असेच वाटत राहते.”
माणिक वर्मांनी आपल्या सात्त्विक स्वरात गायलेल्या त्या नाट्यगीताला संगीतही बाळ कोल्हटकरांनीच दिले होते. पिलू रागात बेतलेले हे गाणे ऐकताना अनेकदा गहिवरून येते. नाटकाचे लेखन बाळ कोल्हटकरांचे, दिग्दर्शक तेच, निर्माते तेच आणि संगीतही त्यांचेच! आता अशी “बाळ” नावाची एकेका विषयातील “बाप” माणसे जन्माला यायचीच बंद झालीत की काय देव जाणे!
गाण्याचा प्रसंग होता, मुलगी लग्नानंतर सासरी जाताना घरच्यांचा निरोप घेते आहे. अवघ्या तीन कडव्यांत कोल्हटकरांनी त्यावेळच्या मराठी कुटुंबांचे भावविश्व रंगीभूमीवर उभे केले होते. स्वाभाविकपणेच मुलगी आईला बिलगते. आपल्या वियोगामुळे आईचे डोळे अश्रूंनी गच्च भरले आहेत, हे तिला दिसत असते. स्वत:चे दु:ख आवरून तीच आईला सांत्वन देते. ती म्हणते –
एकदाच मज कुशीत घेई,
पुसुनी लोचने आई…
तुझी लाडकी लेक अपुले,
घरकुल सोडूनी जाई…
तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी,
निघाले आज तिकडच्या घरी…
त्या काळी बहुतेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असे. त्यामुळे मुलांचे लाडबिड असे काही नव्हतेच. तरीही सर्वांचे एकमेकावरील प्रेम मात्र निखळ, खरे, बावनकशी असे. मुलगी म्हणते, “आई, आता पुन्हा लवकर भेट नाही. पण मला जन्मजन्मांतरी तुझ्याच पोटी येण्याचा आशीर्वाद आज दे.”
वडीलही तिच्यासाठी फार काही करू शकलेले नसतात. पण त्या काळी नाती इतकी घट्ट असत की, तिला वडिलांच्या नुसत्या असण्याचाही तिला केवढा आधार वाटत होता! ती त्यांचा निरोप घेताना म्हणते, “बाबा, माझ्या डोक्यावर तुमच्या प्रेमाचे छत्र होते. ते मला अनमोल आहे, जनरितीप्रमाणे मला सासरी जावे लागत आहे. तुमच्या छत्रछायेबाहेर फक्त सातच पावले टाकली तरी मला तुम्हा सगळ्यांना सोडून उघड्या जगात जावे लागणार आहे.”
पडते पाया तुमच्या बाबा,
काय मागणे मागू…
तुम्ही मला आधार केवढा,
कसे कुणाला सांगू…
या छत्राच्या छायेखालून सात पावलावरी,
निघाले आज तिकडच्या घरी…
शेवटी भावाचा निरोप घेताना ही ताई त्याची चक्क माफी मागते. तिने त्याच्या भल्यासाठी त्याला शिस्त लावायचा प्रयत्न केला आहे. प्रसंगी चार कठोर शब्द ऐकवले आहेत. त्याबद्दल “मनात माझा राग धरू नकोस रे” असे ती त्याला विनवते आणि म्हणते, “आता आपले बाबा थकले आहेत. मला त्यांची काळजी वाटते. पण मी सासरी गेल्यावर त्यांच्यासाठी काही करू शकणार नाही. तू त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. त्यांचा सांभाळ कर.”
येते भाऊ विसर आजवर, जे काही बोलले…
नव्हती आई तरीही थोडी, रागावून वागले…
थकले अपुले बाबा आता, एकच चिंता उरी
निघाले आज तिकडच्या घरी…
परवा माझी मोठी बहीण वयाच्या ८१व्या वर्षी देवाघरी गेली. तिची शेवटपर्यंत सगळ्यांची काळजी करणारा, सगळ्यांच्या भेटीसाठी आसुसलेला, थकलेला चेहरा डोळ्यांसमोर विद्युतदाहिनीत अदृश्य झाला! तसे ती माहेरी, त्या “सगळ्या जगाच्या बापाच्या” घरीच तर गेलीये! पण दिवसभर मन अनाथपणाने घेरून आले होते. तेव्हा उगाचच हे गाणे आठवले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…