- संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
बहिणाबाई चौधरी… जी बाई उभ्या आयुष्यात कधी चार भिंतीआडच्या बंदिस्त शाळेत गेली नाही. पण जिने आयुष्यभर निसर्गाच्या मोकळ्या शाळेत शिक्षण घेतलं. अशी मर्मज्ञ कवयित्री. जिला स्वतःला लिहिता वाचता येत नव्हतं, पण जिच्या कवितांनी अनेक सुशिक्षित माणसांना शहाणपण शिकवलं, अशी तत्त्वज्ञ कवयित्री.
त्या कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या आयुष्यातला हा एक प्रसंग. एके दिवशी बहिणाबाईंचा मुलगा सोपानदेव कॉलेजातून घरी आला. सोबत सोपानदेवांचा एक मित्र होता. घरी आल्या आल्या सोपानदेव आईला म्हणाले, “माय, आज आम्हाले एक कविता शिकविली. बघ मी तुले वाचून दखवितो.”
सोपानदेवांनी पुस्तक उघडून त्या दिवशी कॉलेजात शिकवलेली कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकऱ्यांची ‘मुरली’ कविता वाचून दाखवली.
“ही एक आस मनी उरली
कन्हैय्या बजाव बजाव मुरली
चहूकडे आता शांत,
विश्व शांत आत्मा शांत
कृष्ण शांत राधा शांत,
मुरलीत शांतता भरली
कन्हैय्या बजाव बजाव मुरली
त्या नादरसाचे प्याले, मनी गोविंदाग्रज प्याले शाहीर मुरलीचे बनले,
मन गानि वाजविती मुरली
कन्हैय्या बजाव बजाव मुरली”
एक दोन नव्हे, तर तब्बल त्रेचाळीस कडव्यांची प्रदीर्घ कविता सोपानदेव वाचत होते आणि बहिणाबाई भान हरपून
ऐकत होत्या. कविता संपली आणि बहिणाबाईंनी विचारलं, “सोपाना, किती सुंदर आहे रे ही कविता? काय नाव म्हणालास या कवीचं?”
“गोविंदाग्रज…!” सोपानदेव उत्तरले. गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी कविता लिहिल्या. त्यांचं खरं नाव सांगितलं.”
तेवढ्यात सोपानदेवांबरोबर आलेला तो मित्र बहिणाबाईंना म्हणाला, “तुला ठाऊक आहे मावशी, हा कवी चिक्कार दारू प्यायचा. दारू पिऊन पिऊन तो मेला.”
बहिणाबाई स्वतःशीच हसल्या. त्यांनी सोपानदेवांच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि उघडून स्वतःच्या नाकाशी धरलं. मोठ्ठा श्वास घेत त्या म्हणाल्या, “असेल असेल. तो कवी दारू पित असेल. पण मला तर या पुस्तकात कुठंच दारूचा वास येत नाहीये.”
सोपानदेवांसोबत आलेला मित्र वरमला. बहिणाबाई पुढे म्हणाल्या, “अरे राजा, कोण काय खातो नि काय पितो, याची पंचाईत आपण करू नये. तो कवी दारू पीत असेल कदाचित, पण त्याची कविता किती सुंदर आहे हे बघ की…! आपण नेहमी चांगल्या गोष्टीवर नजर ठेवावी.”
बहिणाबाईंच्या चरित्रातील या लहानशाच प्रसंगात ‘माणसाने माणसांत वावरताना कसं वागावं? आणि कसं वागू नये…!’ याचं एक मोठं सूत्र दडलेलं आहे. आपण आपल्या आजूबाजूला नजर टाकली, तर सोपानदेवांच्या त्या मित्रासारखी जगातील प्रत्येक घटनेकडे काकदृष्टीने पाहणारी अनेक माणसं आपल्याला आढळतात.
कावळ्याची नजर घाणीवर… या म्हणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटनेकडे अशा प्रकारची काकदृष्टी ठेवणारी माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो अनुभवतो. कोणत्याही घटनेत कोणत्याही प्रसंगात केवळ खोट काढायची, उणेपणा शोधायचा, टीका करायची एवढंच यांचं काम असतं. प्रसंग कोणताही असो, घटना कोणतीही असो, ही माणसं केवळ त्यातला उणेपणाच शोधतात.
अशा माणसांना एखाद्या सुंदर तळ्याच्या काठी नेलंत, तर त्यांना त्या तळ्यातलं स्वच्छ नितळ पाणी आणि त्यात विहरणारे हंसपक्षी न दिसता केवळ तळ्याच्या काठाशी असणारा चिखल आणि बेडूकच दिसतात. पौर्णिमेच्या चंद्रबिंबाचं चांदणं न पाहता अशी माणसं केवळ चंद्रावरचे डागच पाहतात.
कोणत्याही गोष्टीतले केवळ दोष शोधण्याची वृत्ती एकदा अंगात भिनली की, नजरेला जगातली केवळ कुरूपताच दिसते. नजरेला मोराचा पिसारा न दिसता केवळ त्याचे ओबडधोबड पायच दिसतात. कोकिळेचा पंचम ऐकू न येता तिचा काळा रंग दिसतो. वास्तविक कुरूपतेतही कुठंतरी सौंदर्य दडलेलं असतं. एका संस्कृत श्लोकात कावळ्याला उद्देशून कवी लिहितात.
गात्रं ते मलिनं तथा श्रवणयो
उद्वेग कृत केकृतम्
भक्षम् सर्वम अपि स्वभाव चपलम् दुश्चेष्टितम् ते सदा। एतै वायस संगयोस्य विनयै दोषेरभीभिः ते सदा यत् सर्वत्र कुटुंबवत्सल मितिः तेनेव धन्यो भवान ||
भावार्थ : हे कावळ्या तुझा वर्ण काळा, आवाज कर्कश्श, चांगल्या वाईटाचा विचार न करता सर्व भक्षण करणारा आणि स्वभावानेही तू चंचल आहेस. पण एका गुणाने मात्र तू धन्य आहेस. तो गुण म्हणजे कुटुंब वत्सलता….! कावळ्याला काहीही खायला मिळाले की, तो सर्व बांधवांना गोळा करतो आणि सर्वांबरोबर खातो. आपलं सुख एकट्याने न उपभोगता सर्वांसोबत उपभोगतो. इथं कवीला सर्वात दुर्लक्षिलेल्या काळ्या कावळ्यातही काहीतरी चांगला गुण सापडलाच ना?
माणसं त्याला शक्य तेवढ्या लवकर टाळायला बघतात. बरं असे लोक स्वतः गुणांची खाण असतात का? तर त्याचं उत्तर “नाही” असंच येतं. स्वतःकडे गुण नाहीत. कर्तृत्व नाही. कला नाही. अशीच माणसं बहुधा इतरांतील दोष शोधतात. कारण त्यांना आपल्यातील नाकर्तेपणा इतरांच्या दोषाआड दडवायचा असतो.
मागे एका मासिकात मी एक विनोदी किस्सा वाचला. शालांत परीक्षेचा निकाल घेऊन घरी आलेल्या मुलाला वडील विचारतात? “काय रे काय रिझल्ट लागला?” “आपल्या डॉक्टर टिपणीसांचा मुलगा अमर नापास झाला.”
मुलगा उत्तरतो.
“ओह… वाईट झालं. पण तुझं काय?”
“त्या पलीकडच्या गल्लीतल्या शंभूनाथ सावकाराचा मुलगासुद्धा नापास झाला.”
“ते जाऊ देत. तू तुझं सांग.”
वडील अधीर झाले होते.
“आपल्या एरियातील नगरसेवक पावशेसाहेबांचा मुलगा विक्रमसुद्धा
नापास झाला.”
“त्या सगळ्यांचं मला सांगू नकोस तू तुझ्याबद्दल बोल.”
वडिलांनी वैतागून विचारले.
“बाबा, जर डॉक्टर टिपणीस, शंभूनाथ सावकार आणि नगरसेवक पावशेंची मुलं नापास होतात, तर तुम्ही तर पोस्टात साधे कारकून आहात. जर मोठमोठ्या लोकांची मुलं नापास होतात, तर तुम्ही तुमच्या मुलाकडून पास होण्याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे…!” या विनोदामागे एक फार मोठं मानसशास्त्र दडलेलं आहे. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी इतरांच्या अपयशाबद्दल बोलायचं. इतरांचे दोष दाखवायचे.
जरा डोळसपणे पाहिलं, तर अनेकजणांना ही घाणेरडी सवय असते. या सवयीमुळेच कदाचित अशा माणसांची प्रगती होऊ शकत नाही. वास्तविक एखाद्या माणसातील दोष हुडकून त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलण्याऐवजी त्या व्यक्तीतले गुण शोधून त्यातून आपल्याला काही बोध घेता आला, तर आपल्याच आयुष्यात बराच सकारात्मक बदल घडू शकतो. जगातल्या प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सद्गुण असतातच असतात. फक्त ते पाहण्याची नजर असावी लागते. ती नजर प्राप्त झाली की, संपूर्ण जग सुंदर दिसू लागतं. जगातलं सौंदर्य अनुभवताना अनुभवता आपलं आयुष्यही सुंदर होऊन जातं. याच संदर्भातली एक बोधकथा अलीकडेच माझ्या वाचनात आली.
एका राजाला स्वतःचं पेंटिंग बनवून घ्यायचं होतं. त्यासाठी त्याने अनेक चित्रकारांना आमंत्रणं दिली गेली. पण राजाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र त्याचं पेंटिंग बनविण्याची कुणाही चित्रकाराची छाती होईना. कारण त्या राजाचा एक डोळा फुटलेला होता तसेच त्याचा एक पाय गुडघ्यापासून तुटलेला होता. एकदा शिकारीला गेला असता वाघानं केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्यानं राजाला एक डोळा आणि एक पाय गमावावा लागला होता. त्यामुळे राजाच्या शरीरात आणि चेहऱ्यात कायमचं व्यंग निर्माण झालं होतं. पेंटिंग बनवायला देशोदेशीचे अनेक चित्रकार येत होते. पण राजाला प्रत्यक्ष बघून येणारा प्रत्येक चित्रकार नाक मुरडत होता.
“व्यंग असलेल्या राजाचं पेंटिंग कसं काढायचं…?” अखेरीस एक चित्रकार तयार झाला. त्याने राजाचं पेंटिंग रंगवलं.
ते पेंटिंग पाहून राजा बेहद्द खूश झाला. त्या चित्रकारानं आपल्या चित्रात काय दाखवलं होतं ठाऊक आहे? त्या चित्रकाराने चित्रात दाखवलं होतं की, राजा वाघाच्या शिकारीला गेलाय. समोर जबडा पसरलेला वाघ उडी मारण्याच्या बेतात आहे आणि राजा एक गुडघा दुमडून एका पायावर बसलाय आणि एक डोळा मिटून वाघावर बंदुकीचा निशाणा साधलाय.
राजाचा नसलेला एक पाय आणि फुटलेला एक डोळा त्या चित्रकारानं बेमालूमपणे दडवला होता. शिवाय राजाचा शूर अणि लढाऊ बाणा त्याने त्या चित्रातून प्रकट केला होता. राजानं त्या चित्रकाराचा यथायोग्य सन्मान केला, हे मी वेगळं सांगायची गरजच नाहीये.
मला सांगा. आपल्याला त्या चित्रकारासारखं गुणग्राही वागणं जमेल का? आजूबाजूच्या सर्व माणसांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून केवळ गुणांकडेच पाहणं आपल्याला साधेल का? थोडा प्रयत्न, तर करून बघूया…!