- क्राइम: अॅड. रिया करंजकर
आरती सोनवणे आणि तिचे पती उमेश सोनवणे हे सरळ स्वभावाचे दाम्पत्य. दोघेही कष्ट करून सुखी असं जीवन जगत होते. त्यांना दोन मुली होत्या. गरजवंतांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते दोघे धावून जात. असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे आजूबाजूची लोकं त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होती. एक दिवस त्यांच्याच ओळखीची शोभा त्यांना भेटण्यासाठी आली. सुनंदा नावाच्या एका स्त्रीला काही पैशांची गरज आहे तर तू त्यांना मदत करशील का? असं तिने विचारलं. आरतीने सुरुवातीला नाही असं सांगितलं कारण रक्कम जास्त होती. ती त्यांच्याकडे नव्हती. सुनंदा आणि तिचा नवरा आरतीकडे आला आणि हाता-पाया पडू लागला. आमच्या मुलीचं लग्न आहे, आम्हाला पैशांची मदत करा. सहा महिन्यांत नाही फेडले, तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. म्हणून त्यांनी आपले बँक पासबुक, रेशन कार्ड, झोपडीची घर पावती, आधार कार्ड, लाइट बिल, असे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आरती यांना देतो असे ते बोलले. त्याप्रमाणे त्यांच्या झोपडीचे जी कागदपत्र होती, रूम विकत घेतलेले अॅग्रीमेंट ते ओरिजनल त्यांनी आरतीला देतो असे म्हटले. त्याप्रमाणे आरती त्यांना दोन लाख रुपये द्यायला तयार झाली. पैसे देण्याअगोदर स्टॅम्प पेपरवर आरती आणि तिच्या पतीने सुनंदा आणि तिच्या पतीकडून व्यवस्थित सर्व लिहून घेतले. सहा महिन्यांत पैसे नाही मिळाले, तर दिलेल्या डॉक्युमेंट्सप्रमाणे कायदेशीर कारवाई करू शकतात, असं त्यांनी त्यात नमूद केले. साक्षीदार यांची सही घेतली व दोन लाख रुपये सुनंदा यांना देण्यात आले. सुनंदा यांनी ज्या मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते, ती मुलगी पळून गेली. वास्तविक ते पैसे सुनंदा यांनी आरती यांना परत करायला पाहिजे होते ते तिने केले नाही. दुसऱ्या मुलीच्या लग्नाला होतील असं तिने सांगितलं. सहा महिने होऊन गेले तरी सुनंदा आणि तिचा पती पैसे परत करेनात. त्यावेळी आरती पैशाच्या मागणीसाठी सुनंदाकडे जाऊ लागली.
माझ्याकडे आता पैसे नाहीयेत मी आल्यावर देते, असं ती सांगत तिला पुन्हा पैशाची गरज लागली तेव्हा ती पुन्हा आरतीकडे आली. ‘मला जास्त पैसे द्या आणि त्याच्यातून तुमचे पैसे घ्या’ असं ती बोलू लागली. आरतीला तिची दया आली. म्हणून आरतीने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून तिला पैसे दिले व सोनाराचे व्याज सुनंदा भरेल असं ठरलं. पण तेही व्याज सुनंदाने भरलं नाही. त्याच्यातलेही पैसे सुनंदा हिने आरतीला दिले नाहीत. दोन महिन्यांत मंगळसूत्र सोडवते असं सुनंदाने सांगूनही आरतीचे मंगळसूत्र सुनंदाने सोडवून दिले नाही. आरतीने सुनंदाच्या मागे पैशाचा तगादा लावल्यावर आरतीच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली की, माझ्या घरामध्ये चोरी करून माझ्या घरातील ओरिजिनल पेपर हिने चोरले आहेत. पोलिसांनी आरती यांना पोलीस स्टेशनला बोलवले असता, आरतीने आणि सुनंदामध्ये पैसे देवाण-घेवाण करताना झालेले अॅग्रीमेंट पोलिसांना दाखवले आणि त्याच्यामुळे पेपर आमच्या ताब्यात आहे, असं तिने सांगितलं. तेव्हा पोलिसांनी पैशाचा व्यवहार आहे, तुम्ही कोर्टात जा, असा त्यांना सल्ला दिला.
हे प्रकरण स्थानिक नगरसेवकाकडे गेल्यावर, सुनंदा हिने आरतीला पैसे दिलेले आहेत. असा एक कागद तिने नगरसेवकाला दाखवला. आरती हिने प्रश्न केला की मला पैसे दिले तर माझी सही तिथे कुठे आहे ते सांग. मात्र तिने उडवा-उडवीची उत्तरं दिली. आरतीने वकिलांचा सल्ला घेऊन कोर्टामध्ये सुनंदा आणि तिच्या पतीविरुद्ध केस दाखल केली. वकिलाने योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आरती आणि तिचा नवरा कोर्टात फेऱ्या मारत आहेत व इकडे सुनंदा लोकांना, ‘त्यांना कुठे जायचे त्यांना जाऊ दे, मी एक रुपया त्यांना देणार नाही, असे सांगत आहे.
आरती आणि तिच्या पतीला गेल्या चार वर्षांत भरपूर मनस्ताप झालेला आहे कारण त्यांच्याकडे एवढी रक्कम नसताना त्यांनी जमवाजमव करून सुनंदा यांना पैशांची मदत केली होती. एवढेच नाही तर आरतीने सुनंदामुळे आपलं मंगळसूत्र गमावलं. गरजू लोकांना मदत करण्याच्या स्वभावामुळे व मैत्रीच्या ओळखीखातर आज आरती आणि तिच्या पतीच्या वाट्याला मनस्ताप आला आहे.
ज्यावेळी लोकांना गरज असते त्यावेळी ती लोकं गरजवंत वाटत असतात आणि गयावया करून लोकांची विनवणी करतात की, आम्हाला मदत करा. पण ज्यावेळी परतफेडीची वेळ येते, त्याचवेळी हे गरजवंत मदत करणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रासाशिवाय काही देत नाहीत. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज असते त्यावेळी देणाऱ्याला कुठे माहीत असतं की, व्यक्ती पुढे पैसे देणार की नाही आणि त्यामुळे मदत करणारा हा चांगलाच प्रकारे फसला जातो.
(सत्य घटनेवर आधारित)