Wednesday, September 17, 2025

छत्रपती शिवाजी महाराज, एक स्मरण!

छत्रपती शिवाजी महाराज, एक स्मरण!
  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

महाराष्ट्राचे, मराठी मनाचे आराध्य दैवत असलेल्या, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, महाराष्ट्राच्या मातीला कसे जगावे, हे शिकविले! हे एक असे भारतीय राजे, ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३०. अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. त्यावेळी भारत मुघलांच्या ताब्यात होता. मुघल शासक हिंदूंवर, स्त्रियांवर, मराठा सैनिकांवर अत्याचार करीत होते, हिंदूंना भरावा लागणारा विशेष जिझिया कर; याचवेळी सह्याद्रीतून गर्जना झाली. शिवनेरी किल्ल्यावर, शिवाई देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या नेत्याचा जन्म झाला. पुढे स्वतःच्या पराक्रमाने जगात नाव दुमदुमले ते ‘छत्रपती शिवाजी राजे भोसले.’

छत्रपती ही एक भारतीय शाही उपाधी, ती राज्याभिषेक झालेल्या हिंदू राजाच्या नावाआधी वापरली जाते. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेचं छत्र धारण करणारा, प्रजेच्या पालन-पोषणाची, संरक्षणाची जबाबदारी घेणारा प्रमुख! शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर तुकाराम महाराज लिहितात,

। शिव तुझे नाव, ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र, विश्वाचे की।

शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांद्वारे राज्याचा विस्तार करत जमीन आणि संपत्ती मिळविली. स्वराज्य असूनही ते अधिकृत नव्हते. औपचारिक पदवी नसल्यामुळे कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा करू शकत नव्हते. ६ जून १६७४, राज्याभिषेकानंतर, कायद्याने स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना स्वराज्याचे ‘छत्रपती’ ही अधिकृत मान्यता प्राप्त झाली. प्रजेला आपला खरा राजा कोण ते कळाले. याशिवाय शिवाजी महाराजांनी नवी कालगणना ‘शिवराज्याभिषेक शक’ सुरू करून ‘शिवराई’ हे चलन जारी केले.

शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सोपं नव्हतं.

१. जिद्द, चातुर्य, बुद्धिमतेच्या जोरावर समस्या, अपयशावर मात केली. २. आपलेपणा, माणुसकीने आपल्या प्रजेवर, मावळ्यांवर जीवापाड प्रेम केले. ३. कणखर, दूरदृष्टीने विचार करत राज्य विस्तारले. ४. आखणीचे चोख व्यवस्थापन यामुळे शत्रू प्रबळ असूनही न भिता हल्ले केले. ५. शांततेने, संयमाने निर्णय घेतले. ६. गनिमी कावा हे त्यांच्या युद्धाचे प्रमुख हत्यार. म्हणूनच त्यांना ‘निश्चयाचा महामेरू …श्रीमंतयोगी’ असे रामदासांनी म्हटले आहे.

बालवयातच माता जिजाऊने ‘आपला जन्म चाकरी करण्यासाठी झालेला नसून भोळ्या-भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, तू स्वराज्य निर्माण कर. सत्यासाठी न्यायासाठी लढ. हे त्याच्या मनावर बिंबवले. दादाजी कोंडदेवांकडून युद्ध व नीती कौशल्यांत पारंगत झाले. वडील शहाजी संस्कृतचे गाढे अभ्यासक. त्यांनी काही शिक्षकांची नेमणूक केली. माता जिजाऊंचा देशाभिमान, करारीपणा, कठीण प्रसंगात निभावून जाण्याचे धैर्य. त्या म्हणत, ‘जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखव आणि जर कोणी रडत असेल, तर त्याला मराठ्यांची जात दाखव.’ जिजाऊंच्या संस्कारातून बालशिवाजी घडत होते. १२ वर्षांपर्यंत बालशिवाजींना विविध विद्या व कलांचा परिचय झाला. लहान वयातच बालशिवाजीने आपली जबाबदारी समजून घेतली. बालवयातील जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत वयाच्या १५व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ‘हर हर महादेव’च्या घोषणेत स्वराज्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली.

सह्याद्रीच्या दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणतात. याच मूठभर मावळ्यांच्या साथीने वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी छोटे-छोटे किल्ले, अनेक मोकळा प्रदेश काबीज करीत, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकत विजयाला सुरुवात केली. पुण्यावर नियंत्रण ठेवून शिवाजी महाराज राज्याचा कारभार पाहू लागले. त्याचवेळी संस्कृत भाषेत स्वराज्याची राजमुद्रा तयार केली. “ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो; तसाच शहाजी पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.”

शत्रूविरुद्ध लढताना महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यामध्ये अनुकूल असलेल्या कमी फौजेच्या साह्याने, गनिमीकाव्याची पद्धत वापरून विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, बलाढ्य मुघल साम्राज्याशी लढा देऊन मराठा साम्राज्याचे स्वप्न सत्यात आणले.

शिवाजी महाराजांचे वैशिट्य

१. सर्व धर्मांना समान मानत. शिवाजी महाराजांचा संघर्ष कुठल्याही जातीधर्मासाठी नव्हता तर रयतेसाठी, मुख्यतः अन्यायाविरुद्ध होता. अनेक मुसलमान त्यांच्याकडे नोकरीला होते. २. शिवाजी महाराज विचाराने प्रगत आणि प्रगल्भ असल्याने कुठल्याही खुळचट विचारांना त्यांनी कधीच जवळ केले नाही. ३. जन्मावर आधारलेली जातवार श्रमविभागणी मोडून काढली. ४. साधुसंतांना, मोठ्यांना, महिलांना यथोचित आदर देत. ५. सामाजिक समतेच्या बाबतीत ते पुढे होते. महाराजांनी शकुन-अपशकुन मानले नाही. अस्पृश्य भेदाभेद हे स्वराज्याच्या वाढीला हानिकारक आहे. हे ओळखून अस्पृश्यता मिटवली. ६. स्वतः जातीने सैनिकांशी विचारपूस करीत. कामगिरीनुसार बक्षीस, बढती देत असत. त्याचबरोबर गैरकारभार करणाऱ्या व्यक्तींना, वृत्तीला, वर्तनाला कडक शासन देत. ७. शिवरायांच्या सैन्यात भारतातील सर्व जातीतील गुणवंतास प्रवेश होता. ८. न्याय निवाडा करताना कोणाची भीडभाड ठेवीत नसत. त्यामुळे अनेक नाती दुरावली. ९. शिवरायांनी अनेक किल्ले बांधले, डागडुजी केली, त्यामागचा विचार, “राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून होते. राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते. दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते.”

महाराजांचे गुणविशेष

१. महाराजांच्या शब्दकोशात आळस हा शब्दच नव्हता, उत्साह होता. चंचलता नव्हती, निग्रह होता, मोह नव्हता, ममता होती, भोगवाद नव्हता, त्याग होता. २. शिवरायांचा आठवावा प्रताप - एकेक किल्ला न्याहाळता महाराजांचे भौगोलिक ज्ञान, दूरदृष्टी समजते. ३. राजकारणात पावले फार सावधतेने टाकली. ४. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, ५. मी स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझे आहे ही निष्ठा. ६. कुशल संघटक.

शिवाजी महाराजांचे कर्तृत्व पाहताना समर्थ रामदास म्हणाले, “महाराष्ट्र धर्म राखणारा जाणता राजा.” महाराजांमुळे महाराष्ट्र धर्माची जाणीव आज तळागाळातल्या जनसामान्यांना झाली. महाराजांचे पुतळे उभारणे, जय भवानी, जय शिवाजी बोलणे सोपे. शिवाजी महाराजांचा नुसता जयजयकार करण्यापेक्षा, त्यांचा विचार आचरणांत आणा. इतिहास जपा, गड किल्ल्यांचे संरक्षण करा. एक स्मरण ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे’

mbk1801@gmail.com

Comments
Add Comment