पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अमित शाहांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत.
अमित शाह बापट यांना म्हणाले, “आपण लवकर बरे व्हा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या”. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून बापट एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचं आमदार म्हणून गिरीश बापट यांनी साधारण ३० वर्षे नेतृत्व केलंय. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. दरम्यान अमित शाह यांचा पुणे दौरा कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातोय.