एकदा मुंबईतील एका मॉलमध्ये आम्ही मुलाला घेऊन फिरायला गेलो होतो. तिथे खाण्यापिण्याची रेलचेल, मुलांचे फुगे उडविणे, चॉकलेट व आईस्क्रीम खाणे अशी धम्माल सुरू होती. अचानकपणे एक लहान मुलगी रडताना माझ्या मिस्टरांना दिसली. ती अतिशय कावरी-बावरी झाली होती. “काय झाले बाळ?” आम्ही तिला विचारले. अर्थात परिस्थितीची साधारण कल्पना आम्हाला आली होती. “मम्मा, मम्मा, मेरी मम्मी किधर हैं?” आम्ही आमचे खाणे टाकून त्या पोरीसोबत तिची आई शोधण्यास धावू लागलो. दहा एक मिनिट पळापळी केल्यानंतर मुलीला तिची आई दिसली. माय-लेकींनी एकमेकींना मिठी मारली. एवढ्या लहान वयात काही क्षणांसाठी का होईना मुलीचा आधार तुटला होता. ती हरवली गेल्यामुळे! पोरीला आई भेटली. आम्ही डोळे भरून हा प्रसंग पाहिला व परत निघालो. त्यामुळे अनेकदा माझ्या मनाला प्रश्न पडतो की, “अनाथ आश्रमातील लेकरे या प्रेमाला पारखी होतात का?” त्यांना आधार देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था, चांगले कार्यकर्ते आपल्या देशात आहेत. ते या मुलांचे नैसर्गिक मायेची पोकळी भरून काढण्यात यशस्वी होत आहेत. यातील काही मुलांना दत्तकही घेऊन जाणारी जोडपी आहेत. तरीही उरलेल्यांना सातत्याने आधार देण्यास आपला समाज कमी पडत नाहीये ना? लोक आपले जुने कपडे किंवा आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात दान करतात. ही त्यातली सकारात्मक बाजू!
अनाथ मुले ही शिक्षक, अभियंता होऊन स्थिरस्थावर होत आहेत व या मुलांचा आधारवड बनत आहेत. अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी १९८० ते २००० अशी दोन दशके अविरत प्रयत्न करणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. अनाथ मुलांमध्ये चेतना जागृत करून, त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम डॉक्टर लवटे यांनी केले. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. बालपणी आई-वडिलांचा आधार, थोडे मोठे झाल्यावर शाळा, मित्रमंडळी यांच्यात रमणे, आपल्या सुख-दुःखात त्यांचा आधार, पुढे नोकरी, संसार, मग वृद्धापकाळ असे एकूण माणसाचे जीवनचक्र सुरू असते. सुख-दुःखाच्या काळात माणसाला अनेकदा आधाराची गरज असते. इतकेच काय निसर्गातही जखमी, विकल पशु-पक्ष्यांना आधार मिळाला की, त्यांचे जीवन सुखावते. मधल्या काळात काही नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर ओढवल्या. कधी दुष्काळ, कधी आर्थिक टंचाई, कुटुंबाला पोसण्याची क्षमता या कारणाने नैराश्य येऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व महाराष्ट्र हादरला. शेतकऱ्यांच्या बायका व मुले या घटनांनी कोसळली. घरातल्या कर्त्या पुरुषाचा आधार गेल्याने कुटुंब व्यवस्था कोलमडली. “आपला उद्याचा दिवस कसा असेल? उद्याचे पोट भरेल का?” या चिंतांनी ते व्यथित झाले. त्यांच्या प्रश्नांची जाणीव होऊन नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाऊंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेषकरून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतात, आधार देतात.
“ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल, त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम समजावा. शेतकरी बळकट होईल, तेव्हा हे साध्य होईल,” असे नाना पाटेकर म्हणतात. अगदी पूर्वीच्या काळी अंध व्यक्तींचे जीवन संपूर्णपणे इतरांवर अवलंबून असायचे. कुटुंब, समाज चांगला वागला तर ठीक, नाहीतर परावलंबनाचे ओझे घेऊन त्यांना जगायला लागायचे; परंतु दृष्टिहीनांच्या जीवनात एक आशेचा किरण घेऊन आल्या हेलन केलर. हेलन या जन्मजात अंध व मूकबधिर नव्हत्या. मस्तिष्कावरण ज्वरामुळे त्या नंतर अंध व मूकबधिर झाल्या. हेलनच्या कुटुंबात त्यामुळे भावनांचा डोंगर कोसळला. त्या काळात हेलनला आई-वडिलांसोबत अॅनी सेल्विन नावाच्या शिक्षिकेचा आधार मिळाला. त्या मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकवायची. त्यांनी हेलनला उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करून योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यापुढे त्या मूकबधिर, अंध विद्यार्थ्यांचा आधार झाल्या. ब्रेल लिपीत लिहिलेली मौल्यवान पुस्तके त्यांनी अंधांसाठी प्रकाशित केली की, जी जगभर अंधांसाठी ज्ञानाचे कवडसे ठरली.
हेलन यांनी अमेरिकन फाऊंडेशन या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवला. त्या निसर्गाच्या खूप जवळ होत्या. आपल्या प्रेरणादायी कविता, रचना यातून त्यांनी आश्चर्यकारकरीत्या निसर्गाचे वर्णन केले आहे. समुद्राच्या लाटा, डोंगरातून कोसळणारा बर्फ, वसंत ऋतूतील बहरलेली वनराई त्यांच्या लिखाणात असायची. आपल्या मराठीत एक म्हण आहे, ती म्हणजे “बुडत्याला काडीचा आधार!” म्हणजे एखाद्या पीडित व्यक्तीला थोडा जरी आधार मिळाला तरी त्या व्यक्तीचं आयुष्य बदलतं. घरातून विविध कारणांनी पळून जाणाऱ्या मुलांचा आधार बनले आहेत, प्रमोद कुलकर्णी. त्यांच्या एनजीओमार्फत – (बिन सरकारी संघटना) आजवर इकडे तिकडे, रेल्वे फलाटांवर सापडलेल्या मुलांची सुटका त्यांनी करून, जवळपास एक लाख मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना “अमेझिंग इंडियन” अॅवॉर्ड मिळाले आहे. अतिशय कठीण अशा कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. घरातील भांडणे, कौटुंबिक अत्याचार, गरिबी, दुर्लक्ष अशा कारणांनी घराबाहेर पडलेल्या लेकरांचा ते आधारवड बनले आहेत. खरोखरच अशा या महान विभूतींबद्दल म्हणावेसे वाटते,
“दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना,
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना,
देह मंदिर… चित्त मंदिर,
एक येथे प्रार्थना….”
खरं तर आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला आधार लागतो. वैद्यांचा, वकिलांचा, मानसोपचार तज्ज्ञांचा आधार, समुपदेशकाचा, ज्येष्ठ व्यक्तींचा, समंजस नात्यांचा आधार. या सर्वांच्या आधाराबरोबर आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा आधार. अशा आधारांनी आपण आपली जीवन नौका पार करू शकतो.
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…