नाशिक: नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. याचे विशेष कारण शिवाजी महाराजांची ६१ फूट मुर्ती आणि २१ फूट लांब कवड्यांची माळ आहे. त्यासोबतच चौकाचौकांमध्ये उभारण्यात आलेले भव्य स्टेज, शिवचरित्रावर आधारित देखावे, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, त्याचबरोबर पोवाडे, शिवगितांचे गायन आधी कार्यक्रमांमुळे नाशिकचे वातावरण भगवे झाले आहे.
शिवाजी महाराजांचा हा भव्यदिव्य पुतळा अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारला आहे. या पुतळ्याची रूंदी २२ फुट तर वजन तब्बल ३ हजार किलो आहे. हा पुतळा बनवण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा ३ मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला. दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एच. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरुवात केली होती. मात्र पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.
तसेच महाराजांच्या गळ्यात २१ फूट लांबीची, ७१ किलो वजनाची, ६४ कवड्यांची माळ नाशिकरांचे लक्ष वेधुन घेत आहे. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. हा भव्य पुतळा आणि कवड्यांची माळ पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत.