मुंबई : ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. राज्यसभेतल्या तीनही खासदारांनी शपथपत्र दिले असेल तर मग शपथपत्र न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच होते का? असे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. या दोन खासदारांचा कोणाला पाठींबा द्यायचे याचा निर्णय पक्का झाला नव्हता का? तळ्यात की मळ्यात अशा द्विधा मनस्थितीत दोन दगडावर पाय ठेवलेले ‘ते’ २ खासदार कोण? यायीच चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.
राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण नऊ खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाकडून केवळ सातच शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या दोन लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झालेली नाहीत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.