नाशिक (प्रतिनिधी) : आज होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विविध शिवमंदिरे सजली असून त्रंबकेश्वरचे मंदिर हे ३६ तास उघडे राहणार आहे, तर कपालेश्वर येथील शिवमंदिर रात्री बारा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्यातील लहान-मोठी सर्वच शिवमंदिरे विद्युत रोषणाईसह नटली आहे. जगात प्रसिध्द असलेल्या नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटे चार वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर भविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
महाशिवरात्री निमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांसाठी त्र्यंबकराजाच्या मंदिराचे कवाडे रात्रभर उघडी असणार आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर प्रशासनाने मंदिर मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ पासून १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबक राजाचे दर्शन घेता येणार आहे. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भग्रह दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात येणार आहे. त्यासोबतच भाविक भक्तांना महाप्रसादाचा देखील लाभ घेता येणार आहे. देणगी दर्शन दिवसभर सुरू राहणार असून देणगी दर्शनासाठी आलेल्याघघ भाविकांकरता सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप देखील उभारलेला आहे.