देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबई शहराला कुणाची तरी नजर लागली आहे की काय? अशी गत सध्या या शहराची झाली आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर हे दुसऱ्या स्थानावर, तर देशात अव्वल क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे. मुंबईतील वाढते हवाप्रदूषण हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यानची ही आकडेवारी आहे. त्यावरून देशातही दिल्लीला दुसऱ्या स्थानी ढकलत मुंबई सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आली आहे व ही तुम्हा-आम्हा मुंबईकरांसाठी मोठी चिंतेची व अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक बाब आहे. ‘स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स’नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीलाही मागे टाकले आहे. या आधी २९ जानेवारी रोजी, ‘स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स’ रँकिंगमध्ये मुंबई दहाव्या स्थानावर होती. या रँकिंगमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा समावेश नव्हता. नंतर १३ फेब्रुवारी रोजी मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीला मागे टाकले. त्यामुळे देशात मुंबईनंतर आता दिल्लीचा नंबर लागतो.
मुंबई आणि उपनगरांतील प्रदूषणात वाढ झाली असून संपूर्ण जानेवारी महिनाच प्रदूषित झाला होता, हे या अहवालातून उघड झाले आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रांत जानेवारी महिन्यातील ३१ पैकी ३१ दिवस म्हणजेच, संपूर्ण महिना हा प्रदूषित आढळला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील प्रदूषणास धूलिकण, वाहनांची वाढती संख्या, अनेक ठिकाणी सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील बांधकामे, मेट्रोची कामे तसेच डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा जाळण्याच्या प्रकारातून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. सोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती तसेच वाऱ्याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमानदेखील या सर्व परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची तसेच दिल्लीप्रमाणे अनेक अन्य उपाययोजना राबवण्याची नितांत गरज सध्या निर्माण झाली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील ‘प्रदूषित’ आणि ‘अतिशय प्रदूषित’ दिवसांची संख्या गेल्या तीन हिवाळ्यांच्या तुलनेत यंदा दुप्पट होती. संशोधनानुसार, मुंबईच्या हवेतील कणांच्या भारांपैकी ७१% पेक्षा जास्त भारात बांधकाम धुळीचा वाटा आहे. यावेळी मुंबईतील प्रदूषणाच्या बाबतीत बीकेसी अव्वल स्थानी आहे, तर देवनार दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंधेरी परिसर आहे. बीकेसीतील बांधकामांमुळे धूळ हा प्रदूषणाचा स्त्रोत आहे, तर देवनारमध्ये डम्पिंग ग्राऊंड, रासायनिक कारखाने आणि बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट हे प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. त्याचप्रमाणे अंधेरीत प्रदूषण वाढण्यास औद्योगिक कारखाने कारणीभूत ठरले आहेत. पर्यावरणविषयक काम करणाऱ्या ‘परिवर्तन’ या संस्थेनेही चिंता व्यक्त करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची बाब मुंबई महापालिकेनेही गांभीर्याने घेतली असल्याचे दिसत आहे. या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने ही आरोग्य आणीबाणीची समस्या बनली आहे. विशेष म्हणजे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यंदाच्या बजेटमध्ये वायू प्रदूषणाचा सामना करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच बांधकाम स्थळावरून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी येत्या काही दिवसांत ठोस पावले उचलणार आहे.
मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनऊप्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरातदेखील बसवण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर शहरात वनीकरण वाढेल, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. दिवसेंदिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत मुंबईकरांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. हवेची गुणवत्ता खालवत असल्याने मुंबईकरांचा श्वास गुदमरत असून प्रदूषित हवेमुळे लहान मुलांबरोबरच वृद्धांना श्वसनांचा त्रास जाणवत असून सर्वाधिक त्रास हा अस्थमा असलेल्या नागरिकांना होत आहे. सतत खोकला येणे, वरचे वर होणारी सर्दी, संध्याकाळी खोकल्याची उबळ वाढणे, नाक गळणे, घसा दुखणे या तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. शहरातील सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच काहींना नव्याने अस्थमा किंवा दमा यांसारखे आजार जडत आहेत. सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुप्फुसाचे विकार बळावण्याचा अंदाजदेखील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एकूणच मुंबईकरांचा श्वास गुदमरलाय, अवघी मुंबईच घुसमटतेय. तिला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर ठोस, असे काही करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.