Sunday, July 14, 2024

शंभो शंकरा!

आसावरी

कंठामध्ये वासुकीनागाचा हार रुळतो. त्रिनेत्र आहेत. भस्माचे अतुलेपण आहे. दिशा हेच त्याचे वस्त्र आहे. अशा नित्य शुद्ध महेश्वराला नमस्कार.

ज्याची अर्चना गंगाजल आणि चंदनलेपनाने होते. मंदारपुष्प अपरून ज्याची पूजा होते. नंदी वृषभाचा स्वामी नि प्रथम गणांचाही स्वामी असणा-या त्या शंकराला वंदन. ज्याच्या मुखकमलाच्या दर्शनाने गौरीचे मुख प्रसिद्ध होते. ज्याने दक्षयज्ञाचा ध्वंस केला आहे. ज्याच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे. त्या शोभायमान नीलकंठास कर जोडून मस्तक लवून प्रणाम.

वसिष्ठ, अगस्त, गौतमादी मुनींनी ज्याचे पूजन केले. चंद्र, सूर्य, अग्नी ज्याचे लोचन आहेत. यक्षरूप धारण केलेल्या, जराधारी असलेल्या हातात पिनाक धनुष्य असलेल्या त्या दिव्य दिगंबर देवास म्हणजेच महादेवास माझे नमन।
असे हे शिवशंभू महादेवाच्या स्वरूपाचे अभयंकर दर्शन. महादेवाची बारा ज्योतिर्लिग भारतभूमीमध्ये स्थापित आहेत.

‘‘सौराष्ट्र सोमनाथच श्रीलैले मल्लिकार्जुनम।
उज्जयिन्यां महाकालं ओमकारममलेश्वरम।। १।।
परल्यां वैद्यनाथच डाकिन्यां भीमाशंकरम।
सेतुबन्धे, तु रामेशं नागेशं दारूकावने।। २।।
वाराणस्यां तू विश्वशं त्र्यम्बक गौतमीतटे।
हिमालये तु केदारं घुश्मेशंच शिवालये।। ३।।
एतानि ज्योतिलिंर्गानि सायं प्रात: पेठत।
सप्तजन्मकृते पापं स्मरणेत विनश्यति।। ४।।’’

सौराष्ट्र प्रदेशात श्रीसोमनाथ आणि श्रीशैलावर श्रीमल्लिकार्जुन नामे शिव प्रतिष्ठित आहे. उज्जयिनी येथे श्रीमहांकाल तर ओंकारेश्वरनी अमलेश्वर नर्मदातिरी स्थित आहे. महाराष्ट्रातील परळी येथे श्रीवैद्यनाथ तर सहय़ाद्रीच्या डाळिनी नामे शिखरावर भीमाशंकर हे ज्योतिर्लिग आहे. भीमा नदीच्या तीरी. सेतुबंधावर श्रीरामेश्वर तर दारूका वनात नागेश्वर प्रतिष्ठित आहे. हे बहुधा औंढा नागनाथाचे स्थान असावे. वाराणसीला श्रीमहांकाल अर्थात विश्वनाथ. अर्थात श्रीकाशीविश्वेश्वर अखिल विश्वाचा स्वामी. हिमालयात श्रीकेदारनाथ मंदाकिनीतिरी वसलेले तर श्रीघृष्णेश्वर वेरूळात. या बारा ज्योतिर्लिगाच्या स्मरणाने सर्व पापे नष्ट होतात.

सांब सदाशिव प्रभू भारीच भोळा. शीघ्र प्रसन्न होतो. आशुतोष आहे. भक्तिपूर्वक पूजले काय नि नकळत व्याधासारखे पूजले काय श्रीशिव प्रसन्न होतात.

धन्य धन्य त्या शिवाची।
त्या शिवशंकाराला वंदन।
तुजवीण शंभो मज कोण तारी।
हे शिवशंभो शंकरा।।

शिवलिंगाची उत्पत्ती अशी झाली?
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. जाणून घेऊया शिवलिंगाच्या उत्पत्तीबाबत काही खास गोष्टी. शिव समस्त जगताचे मूळ आहे, त्यामुळे शिवलिंग पूजन हे संपूर्ण ब्रह्मांड पूजन मानले जाते. शिवलिंगाचा शब्दश: अर्थ घेतला तर शिव म्हणजे परम कल्याणकारी आणि लिंग म्हणजे सृजन. त्यामुळे शिवलंग हे सृजनाचे प्रतीक आहे. श्री शंकराची उपासना सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात केली जाते. शिवशंकराची मूर्ती शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी ख-या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. शिवलिंग हे शंकराचे निर्गुण रूप आहे.

लिंगमहापुराणात उल्लेख केल्याप्रमाणे, भगवान ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वाच्या मुद्यावरून भांडण सुरू झाले. या दोघांमध्ये नेमके श्रेष्ठ कोण असा वाद वाढत गेला; परंतु त्याचा निकाल काही लागेना. हा वाद वाढत असताना अचानक त्या दोघांच्या मधोमध एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. आपल्या दोघांमध्ये अचानक हा तिसरा अग्निस्तंभ कसा आला याचे उत्तर दोघांनाही सापडेना. त्याची सुरुवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्या दोघांनी या स्तंभाचा उगम कसा झाला हे शोधायचे ठरवले. ब्रह्मदेवाने वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णूने खालच्या भागाचा असं ठरविण्यात आले. बराच काळ शोध घेतल्यावरही हे रहस्य काही उलगडेना, शेवटी अतिशय निराश होऊन ब्रह्मा आणि विष्णू मूळ जागी परतले. त्यावेळी तिथे असलेल्या स्तंभातून ‘ॐ..’ असा ध्वनी त्यांच्या कानी पडला. ब्रह्मा आणि विष्णूने त्या स्तंभाला, त्यातील शक्तीला भक्तिभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली. पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग प्रकट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस. शिवलिंग सृष्टीतील पहिले शिवलिंग मानले जाते. ब्रह्मा आणि विष्णूने सर्वात पहिल्यांदा शिवलिंगाची पूजा केली. त्या दिवसापासून शिवलिंग पूजनाची परंपरा अविरतपणे सुरू आहे.

‘महा’देव
शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशंकराची आराधना केली जाते. ‘हर हर महादेव..’, अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शीव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दु:ख येत नाही, अशी श्रद्धा आहे.

ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता तर विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला ‘कैलासनिवासी’ असे म्हटले जाते. ‘आशुतोष’ म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शीव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणा-या शिवाला ‘नीळकंठ’ असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना ‘त्र्यंबकेश्वर’ असेही म्हणतात. ‘ओम् नम: शिवाय’ या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्याची शक्ती आहे. ‘शिव’ म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा ‘नम:’ हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. ‘नम: शिवाय’ या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सार्मथ्य असून तो जगाच्या कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.

शिवाला बेलपत्र प्रिय
एका कथेनुसार.. एकदा विष्णूची पत्नी लक्ष्मीने शार्वण मासात शिवलिंगावर प्रतिदिन १००१ पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहोचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तीमधील सार्मथ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे.

महाशिवरात्री
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुस-या दिवशी व्रताची सांगता केली जाते. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शीव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ असे म्हणतात. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शीव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी :
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रूद्रांक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अघ्र्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राम्हणभोजन घालून व्रतसमाप्ती करावी.

शिवपूजेची वैशिष्टय़े :
>> शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृताने स्नान घालतात.
>> शिवाच्या पूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरतात.
>> शिवपूजेत पांढ-या अक्षता वापरतात.
>> शिवाक्षाला तांदूळ, गहू व पांढरी फुले वाहतात.
>> शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

पाकिस्तानमध्येही महाशिवरात्री
भारतात पूजा-विधी, परंपरा, संस्कार, श्रद्धा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शीव उपासकांची संख्या भारतात लक्षणीय आहे. हर हर महादेव म्हणत कोटय़वधी भाविक विविध मंदिरात शिवाचे दर्शन घेतात. १२ ज्योतिर्लिगांशिवाय हजारो शिव-शंकराची मंदिरे भारतात आढळतात. केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही बम भोलेचा गजर घुमतो. महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. जाणून घेऊया पाकिस्तानमधील शिवमंदिरांविषयी..

कटासराज शिवमंदिर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात शिवाचे कटासराज मंदिर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे मंदिर एका तीर्थस्थळाप्रमाणे आहे. हे मंदिर सुमारे ९०० वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे. देवी माता सती गेल्यानंतर शंकराला अश्रू अनावर झाले. यावेळी महादेवांच्या अश्रूंचे दोन थेंब पृथ्वीवर पडले. एक कटास येथे आणि दुसरा अजमेर येथे पडला. यातील कटास या ठिकाणी महादेवाच्या मंदिराची उभारणी करण्यात आली, असे सांगितले जाते. देखभाल नसल्यामुळे कटासराज मंदिरातील सरोवर आटत चालल्याचे समजते.

उमरकोट शिवमंदिर : पाकिस्तानातील सिंध प्रांतात उमरकोट शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे. अलीकडे ७२ वर्षांनंतर या मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली असून, खजुराहो मंदिरही याच काळात बांधण्यात आल्याचे समजते. या मंदिराच्या बांधकामात भारतातील स्थापत्य कलेचे प्रतिबिंब असल्याचे आढळून येते. फाळणीनंतर कट्टरपंथियांनी या मंदिराचे मोठे नुकसान केले आहे.

कराची शिवमंदिर : पाकिस्तानातील कराची येथे एक मोठे शिवमंदिर आहे. या मंदिराची उभारणी १५० वर्षापूर्वी झाली आहे. या मंदिराला रत्नेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. दर रविवारी या मंदिरात विशाल भंडारा असतो. या मंदिरात शिवासह अनेक देवी-देवतांच्या मूर्त्यां आहेत. फाळणीनंतर कट्टरवाद्यांनी या मंदिराचेही मोठे नुकसान केले होते. २०१४ मध्ये पाकिस्तानातील हिंदूंनी हे मंदिर वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.

मनसहेरा शिवमंदिर : पाकिस्तानमधील चित्ती गट्टी भागात एक शिव मंदिर आहे. हे मंदिर केवळ पाकमधील हिंदूंच्या अस्तित्वाचे प्रतीक नाही, तर याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरातील शिवलिंग सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. दररोज या मंदिरात पूजा-विधी केले जात नाहीत. मात्र, महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात शिवलिंगाव्यतिरिक्त गणपती, पार्वती आणि काली देवीच्या मूर्त्यां आहेत. या मंदिर परिसरात दुर्गा देवीची गुफाही आहे.

जोही शिवमंदिर : पाकिस्तानात असलेल्या जोही भागातही शिवमंदिर आहे. हे मंदिर २०० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना थोडी हटके असल्यामुळे मंदिर आकर्षक दिसते. फाळणीनंतर सर्वाधिक नुकसान या मंदिराचे झाले असून, चारही बाजूंनी मंदिर ढासळलेले आहे. तर काही ठिकाणी जुने अवशेष आढळून येतात. य्मंदिरात अन्य देवतांच्या मूर्त्यां भग्न अवस्थेत आहेत. याची रचना भारतातील आणि नेपाळमधील मंदिरांशी साधम्र्य साधणारी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -