- मनातले कवडसे: रूपाली हिर्लेकर
अगं आई, आज व्हॅलेंटाइन डे आहे. मला जरा लवकर निघायचंय हं. आम्ही सर्व फ्रेंड्स एका कॅफेमध्ये भेटणार आहोत आज,’ असं म्हणत माझा मुलगा आवरायला आत गेला. मी विचार करू लागले. रोज यांचे कोणते ना कोणते डेज असतातच. कधी टेडी डे, कधी प्रॉमिस डे, कधी प्रपोज डे आणि आज तर काय समस्त तरुणाईला भुरळ घालणारा व्हॅलेंटाइन्स डे! म्हणजे त्यांच्या आनंदाला उधाण तर येणारच ना!
१४ फेब्रुवारीसाठी सर्व प्रेमवीर दहा-पंधरा दिवस आधीपासूनच तयारी करत असतात. आधीचे आठ दिवस प्रेमाशी संबंधित वेगवेगळे डेज साजरे होत असतात आणि त्यांची पूर्तता अखेर व्हॅलेंटाइन्स डेने होते. हल्ली फॅशनला फॉलो करत ही मुलं गर्लफ्रेंड व बॉयफ्रेंडला इम्प्रेस करायला धडपडत असतात. नाना प्रकारच्या गिफ्ट्स घेऊन एकमेकांना खूश करण्यासाठी त्यांच्यात अक्षरशः चुरसच लागलेली असते. गल्ल्या-गल्ल्यांमध्ये गिफ्टच्या दुकानात नजरेला मोहक, आकर्षक वाटणारे टेडी बेअर्स, हार्ट शेपची गिफ्टस घेण्यासाठी प्रेमिकांची हीss झुंबड उडालेली असते. आता सगळेच डेज भव्यतेने साजरे करण्याचा ट्रेंड आलेला आहे. काही ठिकाणी व्हॅलेंटाइन्स स्पेशल इव्हेंट्सही आयोजित केल्या जातात. त्याला सळसळत्या तरुणाईचा प्रतिसादही तसाच जोरदार आणि जबरदस्त असतो. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अमुक असा खास दिवस साजरा होत नसे. पण प्रेमाचे दिवस तसे रोजच असायचे. त्यावेळी मनातली ओढ पत्राद्वारे व टेलिफोनद्वारे व्यक्त होत असे. अगदी ‘मेरे पिया गये रंगून, वहाँ से किया हैं टेलिफून’च्या धर्तीवर नसेल, पण लिमिटेड साधनांद्वारे अनलिमिटेड प्रेम व्यक्त केलं जायचं-करता यायचं. आजकाल अनलिमिटेड मेसेज व कॉल्सद्वारे लगेचच प्रेमाचा स्वीकार वा नकार कळवला जातो. सुरुवातीला आकर्षण वाटून जवळ आलेलं प्रेम कालांतराने एकमेकांचे खरे स्वभाव कळल्यानंतर दुरावलं जाऊन त्याला रामरामही ठोकला जातो.
खरं तर प्रेम ही संकल्पना फार उदात्त आहे! प्रेम भौतिक सुखांवर अवलंबून नसतं-नसावं. समोरच्यावर आपलं प्रेम आहे, ते का आहे? का झालं? हे सांगणं जरी कठीण असलं तरी ते समजणं फार आवश्यक आहे. प्रेम हे वाहत्या निर्मळ पाण्यासारखं पारदर्शक आणि प्रवाही असावं. अथांग समुद्रासारखं असावं. आकाशासारखं अमर्याद असावं. प्रेम फक्त प्रेम असावं. त्यात दिखाऊपणा नसावा. प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असावा. प्रेम एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांचा आदर देणारं, मदत करणारं असावं. त्यात धूर्तपणा नसावा. प्रेम स्वार्थी नसावं. प्रेम हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचणारं असावं. कुसुमाग्रजांनी सांगितल्याप्रमाणे :
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं…
प्रेम अमर्याद आहे. त्याचा थांग लागत नाही. ते विशाल आहे. बरं प्रेम हे फक्त तरुणाईतच असतं, असं मुळीच नाहीये. प्रेयसी-प्रियकरच करू शकतात असंही नाही. प्रेम आई-वडील, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणी यांच्यातही असतं. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या असण्याने आपल्याला नकळत जो आधार मिळत असतो तेच प्रेम असतं. आपलं माणूस दुःखी असेल, तर त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवून बोलणं, ‘घाबरू नको, मी आहे,’ यातला दिलासा म्हणजे प्रेम असतं. तान्ह्या बाळाची आपल्या आईप्रति असलेली ओढ, आईची वत्सलता, वडिलांची मुलीवर असलेली माया, मित्रासाठी कुछ भी कर जाने का जिगर, बहिणीला सुरक्षा देणारं भावाचं कवच, आपल्या माणसाला दिलेली यथायोग्य साथ या सर्वातून नेहमी प्रेमच तर व्यक्त होत असतं. प्रेम एकमेकांना छोट्या- छोट्या गोष्टीतून आनंद मिळवून देणारं असावं. प्रत्येक क्षण अनमोल ठरावा, असं वाटणारं प्रेम असावं. प्रेमाला प्रत्येक वेळी नात्याचं लेबल मिळेलच असं नाही. कृष्णाने ज्याप्रमाणे राधेवर केलं, जे कोणत्याच नात्यात बंधलेलं नव्हतं पण तरीही ते अतूट होतं, ते खरं प्रेम आहे. प्रेम त्यागात आहेच, पण प्रत्येकाला त्याग करायला जमेलच असं नाही. त्याग करण्यासाठी तेवढं मोठेपण असावं लागतं. देशभक्तांनी देशावर केलेलं प्रेम हे त्या दर्जाचं आहे. देशसेवा करता करता अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यांच्या बलिदानात देशाप्रतिचं प्रेम आहे.
थोडक्यात, प्रेम ही सुंदर भावना आहे. ती जपता यायला हवी. या अशा सगळ्या विचारात असतानाच मुलाच्या हाकेने माझी तंद्री भंग पावली आणि मी एकाएकी भानावर आले. माझ्या हातात एक छानसं गुलाब देत तो म्हणाला, ‘आई, हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे!’