Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीपरदेशवारीचा फर्जिवाडा

परदेशवारीचा फर्जिवाडा

  • महेश पांचाळ

उत्तर प्रदेशातून मुंबईत नोकरीनिमित्ताने आलेला अवधूत सिंह (नाव बदलेले) हा दोन वर्षे बेकार होता. त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने दुबईमध्ये नोकरी असल्याचे त्याला सांगितले. त्यासाठी अवधूत हा अंधेरीत जाऊन कमलेश कुमारला (नाव बदललेले) भेटला. कमलेशने पासपार्ट आणि व्हीसा तयार करावा लागेल, असे अवधूतला सांगितले; परंतु अवधूतजवळ काही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे व्हिसा कसा होणार? याची अवधूतला चिंता होती. कमलेशने त्याला काही कागदपत्रे मॅनेज करतो, असे सांगून पासपोर्ट तयार करतो, असे आश्वासन दिले. पंचवीस हजार रुपयांचा व्यवहार ठरला. कमलेशने अवधूतच्या नावाचा पासपोर्ट तयार करून आणला. अवधूतचाही त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर व्हिसासाठी अर्ज करण्यात आला. १५ दिवसांत व्हिसा तयार झाला. आता आपल्या नोकरीचे स्वप्न साकार होणार असल्याने अवधूत खूप खूश झाला. तो दुबईला पोहोचला; परंतु ज्या कंपनीच्या नावाने व्हिसा देण्यात आला होता, नोकरीचे ऑफर लेटर होते. त्या कंपनीकडे अवधूतची कोणतेही माहिती नव्हती. काही तरी तांत्रिक गडबड झाली असावी, असे अवधूतला वाटले. हे प्रकरण भारतीय वकिलातीत गेल्यानंतर, अवधूतचा व्हिसा हा बनावट असल्याची बाब निदर्शनास आली. आपण पुरते फसलो गेल्याची भावना अवधूतला झाली. त्याने कशीबशी पुन्हा मुंबई गाठली. त्याने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी मुंबईत विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता.

मधुबन टॉवर जवळ, डी. एन. नगर मेट्रो स्टेशन, अंधेरी (पश्चिम) या परिसरात पासपोर्ट आणि व्हिसा तयार केला जातो अशी माहिती गुन्हे शाखा युनिट ५च्या पोलीस अधिकाऱ्याला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलीसही अचंबित झाले. विविध देशांचे व्हिसा तयार करण्याचा कारखाना मुंबईत असल्याचे त्यांना आढळून आले. या छाप्यात विविध व्यक्तींचे एकूण २८ पासपोर्ट, १६ जणांच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाची कलर प्रिंट, विविध व्यक्तींचे आणि विविध देशांचे एकूण २४ व्हिसा ताब्यात घेण्यात आले. यूएई, मॉरिशस, थायलंड, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, सिंगापूरचे बनावट कागदपत्रांचा यामध्ये समावेश होता. त्याचबरोबर, कॅनडा, इस्तंबूल, फ्रान्स, आदी इतर देशांच्या इमिग्रेशन विभागाचे बनावट रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले. बनावट नोटा तयार करण्याचा तेलगीने कारखाना उघडला होता. त्याच पद्धतीने, बनावट पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्याचा कारखाना मुंबईत असल्याची बाब उघडकीस आली. यामध्ये पासपोर्ट ऑफिसरचा बनावट रबर स्टॅम्प, व्हिसा बनवण्यासाठीचा ब्रास डायचा वापर, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडस बँक, इंडियन बँक, आयडीएफसी बँक, ICICI या बँकातील खात्याचे बनावट तपशील, बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र, जे. जे हॉस्पिटलचे डॉक्टर रबर स्टॅम्प जसे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकृत रबर स्टॅम्प, विमानतळ वैद्यकीय अधिकारी बनावट रबर स्टॅम्प आदी एकूण ४१४ विविध विभागाशी निगडित स्टॅम्प जप्त करण्यात आले. स्टॅम्पिंग मशीन, लॅमिनेशन मशीन, यूव्ही ट्यूबलाइट मशीन, पीव्हीसी आयडी कार्ड (चिप बेस्ड ब्लँक स्मार्ट कार्ड), स्टॅम्प बनवणारे रबर स्टॅम्प ग्रे कलर शीट, क्लॅम्प आणि प्लायवुड, पारदर्शक शीट, लॅमिनेशन पेपर, प्लास्टिक रबर स्टॅम्प होल्डर, मिनी डेटर, लोखंडी स्टॅम्प, प्रिंटर शाई, पासपोर्ट इंक, लॅमिनेशन प्लास्टिक, प्रिंट पेपर, पासपोर्ट छपाईसाठी साधा जाड कागद, सरकारी अधिकृत स्टॅम्प ब्लँक्स लसीकरण प्रमाणपत्र, पी. शिवणकामाचा सुई-धागा, कात्री, ब्लेड, फॅविस्टिक, कटर, स्टीलची पट्टी, राजमुद्राचे प्रतीक आणि भारत सरकार, आयकर विभाग असे लिहिलेले चांदीच्या रंगाचे रिफ्लेक्टर स्टिकर आणि आरोपीने वापरलेले हँडसेट, २ संगणक, ३ कलर प्रिंटर, १ स्कॅनर, ७ पेन ड्राइव्ह आणि इतर संगणक साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली, तर एकजण फरार आहे. यापूर्वीही बनावट पासपोर्टच्या आधारे या टोळीने अनेकांना परदेशात पाठवले आहे. बनावट रबर स्टॅम्प, बनावट पासपोर्ट, बनावट व्हिसा, बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्रे, बनावट बँकखाते स्टेटमेंट देणारी आंतरराज्य टोळीला कार्यरत असल्याची माहिती तपास निष्पन्न झाली असून, या टोळीने आतापर्यंत शेकडो तरुणांकडून कोट्यवधींची माया गोळा केली आहे.

तात्पर्य : भारतात लोकसंख्या मोठी आहे. जगातील इतर देशांना मनुष्यबळ पुरविण्याची ताकद भारतात आहे, हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे आखाती देशात, दक्षिण आफ्रिकेसह फ्रान्स, इंग्लंडसारख्या देशात कष्टकरी वर्गाला हाताला काम मिळू शकते, याची जाण सर्वसामान्य भारतीय नागरिकांना आहे. स्कील वर्कर म्हणून एखाद्या भागातील तरुण परदेशात नोकरीसाठी गेला, तर तो आपल्या ओळखीच्या मंडळींना त्या ठिकाणी नोकरीची संधी असेल, तर आवर्जून सांगतो. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. देशाबाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट आणि व्हिसा आता फर्जी मिळत असतील, तर विश्वास कोणावर ठेवायचा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -