मुंबई: उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. कालच्या निर्णयानंतर आता आणखी एक धक्का निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना दिला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच वापरता येणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले.
आता, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला अजून एक धक्का देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंत वापरता येणार असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने निकालपत्रातच तसे नमुद केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.