Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीमध्य प्रदेशातील रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी

मध्य प्रदेशातील रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी

धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, एका रुद्राक्षासाठी लाखो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता

कुबेरेश्वर धाममध्ये महाराष्ट्राच्या २ महिला आणि एका मुलाचा मृत्यू; २००० हून अधिक जण आजारी

सेहोर (मध्यप्रदेश) : सेहोरच्या कुबेरेश्वर धामच्या रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी लाखोंची गर्दी उसळल्यामुळे कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती उद्भवली होती. महोत्सवात शुक्रवारी ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा महाराष्ट्रातील जळगाव येथून आपल्या आई-वडिलांसोबत आला होता. तर मागिल २ दिवसांत रुद्राक्षासाठी आलेल्या २ महिलांसह ३ जणांचा मृत्यू झाला असून २००० हून अधिक जण आजारी पडले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सेरोह स्थित कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सकाळपासूनच लाखो भाविक रुद्राक्षासाठी रांगेत उभे आहेत. पण अफाट गर्दीमुळे सध्या रुद्राक्ष वाटप थांबवण्यात आले आहे. रुद्राक्षाच्या आशेने भाविक गुरुवारी दिवसभर रांगेत उभे होते. पण त्यांना रुद्राक्ष मिळाले नाही. रात्रीही भाविकांची ये-जा सुरुच होती. शुक्रवारी सकाळी पुन्हा ते रांगेत उभे राहिले. गर्दी एवढी होती की पाय ठेवायलाही जागा नाही. कार्यक्रमस्थळी लाखोंची गर्दी आहे. शुक्रवारीही गर्दीमुळे रुद्राक्ष वाटप थांबवण्यात आले. परिणामी, देशभरातील शेकडो भाविकांना रुद्राक्षाविना आल्यापावली परतावे लागले.

कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या रुद्राक्ष महोत्सवाला जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी व २ मुलांसह आले होते. भट्ट यांनी सांगितले की, त्यांचा ३ वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची प्रकृती काहीशी बिघडली होती. वाहनाची सुविधा नसल्यामुळे आम्ही पायीच आलो. रस्त्यात मुलाची प्रकृती आणखी बिघडली. त्याला आम्ही जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे त्याच्यावर आयसीयूत उपचार करण्यात आले. पण शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अकोल्याच्या ४० वर्षीय मंगला गुरुवारी सायंकाळी चक्कर येऊन कोसळल्या होत्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, गुरुवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या ५० वर्षीय मंगलाबाई नामक महिलेचाही महोत्सवात मृत्यू झाला.

धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, लाखो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता

मध्य प्रदेशातील सेहोर येथील कुबेश्वर धाम येथे आयोजित केलेल्या या रुद्राक्ष महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमात झालेल्या गोंधळातून मोठा हाहा:कार माजला आहे. तब्येत बिघडल्यामुळे हजारो जण रुग्णालयात दाखल झाले आहेत तर शेकडो महिला भाविक अजूनही बेपत्ता आहेत. सेहोर येथील कुबेश्वर धाम येथे शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे देशभरातील जवळपास १५ लाख भाविक या ठिकाणी पोहोचल्याने व अपूर्ण नियोजनामुळे झालेल्या गोंधळामुळे कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपला दौरा रद्द करावा लागला.

जवळपास १५ किलोमीटर लांबीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. कुणी आसामवरून, तर कुणी कर्नाटक तर कुणी गुजरात मधून आले होते.

मध्य प्रदेशातील सेहोर या छोट्याशा गावाजवळ असलेल्या कुबेश्वर धाम येथे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवासाठी लाखो लोक जमले होते. या शिवपुराण कथेची आणि रुद्राक्ष महोत्सवाची त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून जाहिरात केली होती. जो ही शिवपुराण कथा ऐकायला येईल त्याला इथूनच एक रुद्राक्ष दिला जाईल आणि हा रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पिल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात, असा दावाही प्रदीप मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे देशभरातून या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता होती.

१६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी असा कथावाचन व महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेला कथा ऐकण्यासाठी १५ तारखेपासूनच या ठिकाणी गर्दी होऊ लागली. देशभरातून आलेल्या जवळपास आठ ते दहा लाख भाविक आणि त्यांच्या वाहनांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी इतकी मोठी होती की अभूतपूर्व म्हणण्याची वेळ आली. मात्र या ठिकाणी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत या ठिकाणी पोहोचायला बराच वेळ लागला. या ठिकाणी रुद्राक्ष महोत्सवादरम्यान आपल्याला रुद्राक्ष मिळेल या आशेने लाखो भाविक एकाच ठिकाणी जमले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन हजारो महिला यात जखमी झाल्या तर मोबाईल नेटवर्क सुद्धा क्रॅश झाले.

महाराष्ट्रातूनही जवळपास सर्वच जिल्ह्यातून या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी व रुद्राक्ष मिळवण्यासाठी विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अकोला, अमरावती, बुलढाणा, नाशिक, जळगावसह इतरही जिल्ह्यातील अनेक महिला गेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी लाखोंच्या गर्दीत त्या बेपत्ता झाल्या. अनेक महिला या सापडल्या तर अजूनही अनेक महिला बेपत्ता आहेत. आज या गर्दीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महिलेची तब्येत बिघडल्याने मृत्यू झाला आहे. तर या गर्दीमुळे व चेंगराचेंगरीमुळे हजारो भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

गुरुवारी सुमारे ३५ जण आपल्या नातलगांपासून हरवले होते. आज परिस्थिती नियंत्रणात आहे. गुरुवारी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे रुद्राक्ष वितरण केंद्राजवळील बॅरिकेड्स तुटले. त्यामुळे आज रुद्राक्ष वाटप थांबवण्यात आले आहे.

शुक्रवारी भाविकांना संबोधित करताना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, तुम्ही लोक येथे आलात, भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. ही माझी प्रार्थना. आमच्याकडे जेवण सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असते. घाबरण्याची गरज नाही. २२ विहिरींचे पाणी येथे येत आहे. लाइट गेल्यावर थोडी समस्या येते. त्याबद्दल माफी असावी.

हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी अनाउंसमेंट

कार्यक्रमस्थळी हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी सातत्याने अनाउंसमेंट होत आहे. यंदाच्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकाची विक्रमी गर्दी झाली आहे. यामुळे कार्यक्रमस्थळी काहीशी अनागोंदी निर्माण झाली आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांनी रुद्राक्ष भेटेल या आशेने कुबेरेश्वर धाम परिसरात डेरा टाकला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -