पोर्तुगाल (वृत्तसंस्था): तब्बल ४ हजार लहान मुलांचे पोर्तुगालमधील कॅथलिक चर्चमधल्या धर्मगुरुंकडून लैगिंक शोषण झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एका स्वतंत्र आयोगाने हा स्फोटक दावा केला आहे.
पोर्तुगालमधील बाल मानसोपचार तज्ज्ञ पेड्रो स्ट्रेच यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार मागील ७० वर्षांत कॅथलिक धर्मगुरुंगकडून ४ हजार मुलांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचं म्हटलंय. आयोगाच्या अहवालानुसार लैंगिक शोषण झालेल्या पीडित मुलांचं वय १० ते १४ च्या दरम्यान होतं. हा अहवाल म्हणजे केवळ हिमगनाचं टोक असल्याचं पेड्रो यांनी म्हटलंय. खरी आकडेवारी याहीपेक्षा भयंकर असल्याचा दावा पेड्रो यांनी केला आहे.
२०२१ मध्ये फ्रांन्सचा एक अहवाल समोर आला होता. या अहवालामध्ये ३ हजार कॅथलिक धर्मगुरुंकडून २ लाखांपेक्षा अधिक मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल नमुद करण्यात आलं होतं. त्यानंतर पोर्तुगालमध्ये या स्वतंत्र आयोगाकडून २०२२ मध्ये काम करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
यातील अधिक धक्कादायक बाब अशी की, पोर्तुगालमधील सरकारी वकिलांच्या माहितीनूसार या प्रकरणांची सुनावणी होऊ शकते पण आरोपींवर कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे लैंगिक शोषणाचे नियम बदलले पाहिजेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच याआधीही ज्या धर्मगुरुंनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे, असं मत आयोगाकडून व्यक्त करण्यात आलं आहे.