कल्याण : नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण झालेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथील निकृष्ट कामाची चौकशी व्हावी तसेच तेथील उपहारगृहाला मराठी पाटी लावण्यात यावी याबाबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, रोहन आक्केवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवरासाठी १९ कोटी खर्च करण्यात आला आहे, परंतु उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी त्यातील मुख्य द्वाराचा लहान दरवाजा पडला. अशाप्रकारच्या निकृष्ट काम कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच हे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
सरोवराच्या येथील उपहारगृहाला इंग्लिश मध्ये ‘कॅफे’ असं नाव देण्यात आलं आहे, ते येत्या २७ फेब्रुवारीला असलेल्या मराठी भाषा दिनाच्या अगोदर हे नाव मराठीत करण्यात यावे नाही तर येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.