मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन केले आहे. १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.