मुंबई : केवळ टोमणे मारुन राजकारण चालत नाही, आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा केला. राजकारणात जे योग्य होतं ते आम्ही केलं, कारण आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही, असे सडेतोड मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना मांडले.
शिंदे गट जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडला, त्यावेळी भाजपाची त्यांच्यावर नजर होती का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिले.
जून महिन्याच्या अखेरीस अचानक शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि भाजपासोबत त्यांनी सत्तास्थापना केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाने भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यावर बोलणे भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी टाळले. पण अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात बोलताना सडेतोड मत मांडले. यावेळी त्यांनी अतिशय विखारी शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्यावर टीका केली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात अशी दुहेरी लढाई सुरू आहे. २० जून रोजी एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत २९ आमदार होते. हे सर्वजण सुरतला गेले. ५५ पैकी २९ आमदार आणि गटनेते पक्षाबाहेर पडले होते. याचाच अर्थ शिंदेंसोबत जास्त आमदार होते. म्हणजेच पक्ष गटनेत्याजवळ होता. त्याच दिवशी आम्ही सरकार स्थापन केले असते. त्यानंतर २५ जूनपर्यंत म्हणजेच पुढच्या ५-६ दिवसात त्यांच्यासोबत ४० आमदार होते. आम्हाला संधी होती, त्यामुळे आम्ही त्याचा फायदा घेतला, असेही फडणवीस म्हणाले.
“आम्ही कोणाच्या पाठीशी होतो का, हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. ते लोक स्वत: बाहेर पडले होते. विरोधी पक्षात असताना नैराश्यातून किंवा सत्तेच्या लालसेपोटी काही नेतेमंडळी बाहेर पडली तर आपण समजू शकतो. पण तुमच्याकडे सत्ता असताना आणि तुम्ही स्वत: मुख्यमंत्री असताना जर तुमच्याकडे ७५ टक्के लोक तुमच्या नाकावर टिच्चून बाहेर पडत असतील तर त्यासाठी उद्धव ठाकरेंनी टोमणे मारत बसण्याऐवजी आत्मचिंतन करायला हवे. ते लोक बाहेर पडले. आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा केला. कारण आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही. जगात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. त्यामुळे ‘याला संपवू त्याला संपवू’ अशा मुर्ख्यांच्या नंदनवनात आम्ही वावरत नाही, असे अतिशय स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी उत्तर दिले आणि उद्धव ठाकरेंना सुनावले.
आम्हाला राजकारण करायचेच आहे. केवळ सत्तेचे नव्हे तर विकासाचे राजकारण आम्हाला करायचे आहे. एक व्यक्ती इतके आमदार सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडली आहे आणि सत्ता स्थापन न करता भजन करत बसायचे असे शक्य नव्हते. त्यामुळे राजकारणात जे योग्य होते ते आम्ही केले, असे फडणवीस म्हणाले.