Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणखासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक दोघेही खोटारडे

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक दोघेही खोटारडे

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला समाचार

कुडाळ (प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५२ किमी अंतराचे रस्ते हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे योगदान आहे हे रस्ते आपण मंजूर केल्याचे खासदार विनायक राऊत सांगून खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगून शेतकऱ्यांच्या खावटी कर्जाची केलेली माफी ही ठाकरे सरकारमुळे स्थगित होती ही स्थगिती लवकरच उठवून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कुडाळ येथील भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, युवा मोर्चाचे बंड्या सावंत, रुपेश कानडे, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे केंद्रीय मंत्री सिंग यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या पत्रव्यवहारांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५२ किमी अंतराचे रस्ते हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे झाले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना खासदार विनायक राऊत यांनी रस्ते मंजूर करून आणल्याचे केलेले वक्तव्य हे हास्यास्पद आहे असे सांगून विनायक राऊत यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये. तसेच जनतेला माहिती देताना खोटी आणि फसवणुकीची माहिती देऊ नये असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे रस्ते केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या योगदानामुळे झालेले आहेत असे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत व आमदार वैभव नाईक यांचा फसवणुकीचा धंदा

खावटी कर्ज माफी संदर्भात शिवसेनेचे खासदार राऊत व आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदा घेऊन चुकीची माहिती दिली. मुळात २०१९ मध्ये फडणवीस सरकारच्या माध्यमातून १२ कोटी एवढे खावटी कर्ज माफीचा आदेश निघाला होता यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना लाभ होणार होता. मात्र ठाकरे सरकारने या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला तसेच जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे, वालावल, निरवडे, न्हावेली या सहकार सोसायट्यांच्या ३७१ शेतकऱ्यांचे ४० कोटी ६६ लाख ही कर्ज माफी देण्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र आता ही कर्जमाफी देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने आराखडा तयार केला आहे त्या संदर्भात सहकार मंत्री यांनी मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन केले आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा असणार आहेत असे त्यांनी सांगून आतापर्यंत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे जर हिम्मत असेल तर त्यांनी कर्जमाफी संदर्भातील कागदपत्र दाखवावीत असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -