Thursday, July 10, 2025

खारघरच्या कृषी महोत्सवात कर्जतची कलिंगडे खाताहेत भाव

खारघरच्या कृषी महोत्सवात कर्जतची कलिंगडे खाताहेत भाव

वदपमध्ये पिकलीत १० किलो वजनाची कलिंगडे


कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील वदप येथे कलिंगडाची शेती केली जाते. तेथील कलिंगडे सध्या पनवेलच्या खारघरमधील कृषी महोत्सवात भाव खाताहेत. विनय वेखंडे या प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात तब्बल १० किलो वजनाची कलिंगडे लागली आहेत. ती या कृषी महोत्सवात प्रमुख आकर्षण ठरली आहे. महाशिवरात्रीसाठी कलिंगडाला मोठी मागणी असते. त्यामुळे ही महाकाय कलिंगडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


कर्जतच्या वदप गावातील शेतकरी विनय वेखंडे हे गेल्या दहा वर्षांपासून कालिंगडाची शेती करतात. ‘ब्लॅक बॉय’ आणि ‘शुगर’ या जातीच्या कलिंगडांचे पीक ते घेतात. ‘शुगर’ जातीची कलिंगडे लहान आकाराची लांबट असतात. बाजारात त्यांना मोठी मागणी असते. मात्र या वर्षी त्यांच्या शेतात केवळ ‘ब्लॅक बॉय’ जातीची कलिंगडे आहेत. महाशिवरात्रीसाठी कलिंगडांना मोठी मागणी असते. त्यामुळे प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी विनय वेखंडे यांनी शेतात कलिंगडाचे पीक घेण्यासाठी तसे नियोजन केले. मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनातून त्यांनी ही शेती केली. त्यात त्यांच्या कलिंगडाच्या वेलींना साडे चारपासून दहा किलो वजनापर्यंतची कलिंगडे लागली आहेत. पाण्याचे आणि सेंद्रिय खतांचे योग्य नियोजन. कृषी विभागाकडून सातत्याने मिळणारे मार्गदर्शन. यामुळे कलिंगडाचे हे पीक दरवर्षी चांगले आणि जोमदार येते. कृषी महोत्सव आणि बाजारात ही कलिंगडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.



शिवभक्तांचीही खरेदीसाठी झुंबड


महाशिवरात्रीला बहुतेक भाविक कलिंगड खातात. हे लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील भाविकांचे आदरस्थान असलेल्या वैजनाथ तीर्थस्थळ येथे वेखंडे कुटुंब गाडीतून कलिंगडे विक्रीसाठी नेतात. याशिवाय त्यांच्या गावाजवळ असलेल्या कुशीवली येथील मंदिरात देखील शिवभक्त दर्शनानंतर कलिंगड खरेदीसाठी गर्दी करतात. त्यामुळे तेथे देखील कलिंगडाची चांगली विक्री केली होते. सध्या पनवेल खारघर येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात वेखंडे यांच्या शेतातील कलिंगडे भाव खाताहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >