औरंगाबाद : संशयाचे भूत डोक्यात शिरलेली पत्नी, तिला साथ देणा-या सासू आणि मेव्हणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. पतीने त्याची पत्नी, मेव्हणी आणि सासूला केलेल्या मारहाणीत तिघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. या मारहाणीत मेव्हणीचे हात-पाय मोडले आहे. ही घटना शहरातील मुकुंदवाडी भागात घडली.
पतीच्या बाहेरख्यालीपणामुळे नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत असल्याने पत्नी माहेरी आली होती. वारंवार सांगूनही पत्नी नांदायला घरी परत येत नव्हती. तसेच ती पतीवर लक्ष ठेऊन होती. अन्य महिलेशी बोलताना आढळल्यास तिघीजणी मिळून फोन करून त्याला जाब विचारून भांडण करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने अखेर सासरवाडी गाठत पत्नी, मेव्हणी आणि सासूला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
बळीराम हरिभाऊ वाडेकर असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर त्याची पत्नी सोनी बळीराम वाडेकर, सासू कडूबाई गायकवाड आणि मेव्हणी आशा सोमनाथ इंगळे अशी तिन्ही जखमी महिलांची नावे आहेत. तिन्ही जखमी महिलांवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बळीराम याची पत्नी सोनी वाडेकर यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी, सासू गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.