नवी दिल्ली : निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपिठाने आज राखून ठेवला आहे. यामुळे सदर प्रकरण ७ न्यायमूर्तींकडे जाणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे.
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार कायदेशीर आहे का, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा आज सलग तिसरा दिवस असून दोन्ही बाजूंनी कायद्याचा कीस पाडण्यात आला.
१४ फेब्रुवारीरोजी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर काल शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिवाद केला. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.