पुणे : शिवसेनेच्या माजी मंत्र्याविरोधात महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने चक्क शासकीय विश्रामगृहातच बलात्कार केल्याचा आरोप केला असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे यांच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन उत्तम खंदारे यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका ३७ वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी महिलेला लग्नाचे आणि मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून शासकीय विश्रामगृहात बोलावून बलात्कार केला. तसेच महिलेला पट्ट्याने मारून, पळून जाऊ नये म्हणून चाकूचा धाक दाखवला. या सर्वांमधून महिला गर्भवती राहिली. त्यानंतर महिलेला मुलगा झाला. यात मुलाला सांभाळण्यासाठी मंत्र्याने महिलेला चेक दिला, मात्र तो चेक बाऊंस झाला. यानंतरही कोणाला सांगितले तर मारून टाकेन अशी धमकी खंदारे यांनी दिल्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन उत्तम खंदारे यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वटले नाही. चेक बाऊंस झाले असले तरी पैसे मिळतील या आशेने ही महिला बरेच दिवस गप्प होती. मात्र या महिलेने मुलाच्या संगोपनासाठी पैशाची मागणी केली असता आरोपी उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.