Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपत्रकार शशिकांत वारिसेच्या मृत्यूनंतरचे राजकारण...!

पत्रकार शशिकांत वारिसेच्या मृत्यूनंतरचे राजकारण…!

  • माझे कोकण: संतोष वायंगणकर

६ फेब्रुवारी २०२३ रोजी राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला. हा अपघाती मृत्यू की घातपात? याचा पोलीस तपास करीत आहेत. मात्र या प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांनी मनात राग ठेवून पत्रकार शशिकांत वारिसे याच्या अंगावर थार गाडी घातली. या अपघातानंतर पत्रकार वारिसे यांना कोल्हापूरला अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वारिसे याचा मृत्यू झाला. यातील शशिकांत वारिसे हे मुंबईतील महानगरी टाइम्सचे पत्रकार होते. पंढरीनाथ आंबेरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचा आणि रिफायनरी समर्थनाचा बॅनर लावला होता. या बॅनरवर टिप्पणी करणारी पंढरीनाथ आंबेरकर यांची बातमी वारिसे यांनी देत आंबेरकर गुन्हेगार असल्याची टिप्पणी बातमीत केली होती. महानगरी टाइम्सची ही बातमी वारिसे यांनी व्हाॅट्सअ‍ॅप ग्रूपवर फिरवली. या बातमीत रिफायनरी समर्थकांचा पंढरीनाथ आंबेरकरांच्या बॅनरला आक्षेप असल्याचे म्हटले होते. मात्र, रिफायनरी समर्थकांचे कुणाचे नाव या बातमीत नाही. आपल्या विरोधी बातमी फिरवून बदनामी करतो, याचा राग पंढरीनाथ आंबेरकर यांनी मनात धरून हा अपघात घडवला. यात शशिकांत वारिसेचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राजापूर पोलिसांनी भादंवि ३०४, ३०२ आदी कलमांखाली गुन्हेही दाखल केले. संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला अटकही करण्यात आली. पत्रकाराच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्यात आले ही घटना महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठीही अतिशय गंभीरच आहे. यामुळेच महाराष्ट्रातील पत्रकारांनी राज्य सरकारकडे या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घातले. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे राज्य सरकारने पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरण गंभीरतेनेच घेतले आहे. कोकणात असे पहिल्यांदाच घडले आहे. एखाद्या बातमीबद्दल कुणालाही आक्षेप असूच नये असे मी मुळीच म्हणणार नाही. पत्रकाराच्या लिखाणात काही दोष आढळला तर त्यासाठी खास कायद्याद्वारे तरतूद आहे. त्यातून मानहानी झाली म्हणून कोणीही न्यायालयात न्याय मागू शकतो. न्यायालयात डिफरमेशनच्या आजही अनेक केसेस चालू आहेत. यामुळे पत्रकार शशिकांत वारिसेच्या लिखाणात पंढरीनाथ आंबेरकर यांना चुकीचे आक्षेपार्ह वाटल असेल तर कायदेशीर मार्ग होता. तो कायद्याचा मार्ग न स्वीकारता चुकीच्या पद्धतीने जे कृत्य केले, त्याचे समर्थन करता येणार नाही. पैसा आहे म्हणून वाट्टेल ते करण्याची, वागण्याची मुभा या देशात कुणालाही नाही. मात्र या सर्व घटनेत पत्रकार शशिकांत वारिसे याचे कुटुंब उघड्यावर आले. वारिसे यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि त्यांचा एकुलता एक मुलगा यश आहे. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार संघटना पदाधिकाऱ्यांनी वारिसे यांच्या घरी भेट घेतली. तिथले वास्तव चित्र समोर आले तेव्हा सरकारही जागे झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या यश वारिसेची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करता येणार नाही. अशा भेदरलेल्या अवस्थेतील यशच्या पाठीशी उभे राहण्यासाठी दुर्दैवाने फार कोणी पुढे आले नाहीत. शशिकांत वारिसे प्रकरणात न्याय व्यवस्थेसमोर पोलीस तपासात जे पुरावे सादर होतील त्यावर न्यायालय न्याय देईलच; परंतु खऱ्या अर्थाने यशच्या भवितव्याचा विचार करण्याची आवश्यकता होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलतेने २५ लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर केली. तसे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीरही केले. यशचे पुढील शिक्षण व त्याला सक्षमतेने उभे राहण्यासाठीही पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढे सगळे एका बाजूला घडत असताना नेहमीप्रमाणे कोणत्याही विषयात राजकारण करणाऱ्यांनी फक्त राजकारणच करण्याचा प्रयत्न केला. रिफायनरी प्रकल्प जनतेला आणि सरकारला हवा असेल, तर होईल आणि जनतेला आणि सरकारला नको असेल तर तो प्रकल्प होणारही नाही. मात्र, पत्रकार शशिकांत वारिसेचा मृत्यू समोर ठेवून जे राजकारण करण्यात आले ते अशोभनीयच होते. खा. विनायक राऊत आणि शिवसेनेचे प्रवक्ते यांनी तर विविध स्टेटमेंटमधून राजकारण कुठल्या पातळीवरचे होऊ शकते हेच दाखवून दिले. खरे तर सगळ्या पेक्षा खऱ्याअर्थाने आवश्यकता होती आणि आजही आहे. शशिकांत वारिसे यांचा मुलगा यश वारिसेला आधार देण्याची, कोरड्या राजकीय भाषणबाजीने कुटुंब उभे राहात नाही. त्यासाठी मदतीचा हात पुढे करत पुढाकार घेण्याची गरज होती. मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी राजकीय, सामाजिक पोळी भाजण्यासाठी पुढे येणाऱ्यांचीच संख्या अधिक होती हे दुर्दैवच म्हणाव लागेल. जनतेचा बुद्धीभेद करून दीर्घकाळ कुणाला राजकारण करता येणार नाही. त्याचबरोबर सोबत चुकीचे माणसे घेऊनही राजकारणात, समाजकारणात कुणाही नेत्याला, पुढाऱ्याला पुढे जाता येत नाही. हे कालप्रवाहात अनेकदा सिद्ध झाले आहे. या प्रकरणानंतर अनेकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यात शशिकांत वारिसेला न्याय देण्याची भूमिका कोणाची किती होती हेही यानिमित्ताने समोर आले आहे.

राज्य सरकारने शशिकांत वारिसेच्या कुटुंबीयांना २५ लाखाच अर्थसहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. ती २५ लाखाची आर्थिक मदत तत्काळ दिली जावी. वारिसे कुटुंबाला जोवर राज्य सरकार मदत देत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील पत्रकारही स्वस्थ बसणार नाहीत एवढे निश्चित!

santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -