नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण हे मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनले आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे. मात्र पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा दुसरा क्रमांक पाहता प्रदूषणामुळे हैराण झालेली जनता पाहता दिवसेंदिवस मुंबईकरांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स आयक्यू एअर नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. ही आकडेवरी २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानची असून देशातही दिल्लीला दुसऱ्या स्थानी ढकलत मुंबई पहिल्या स्थानावर असलेली दिसून येत आहे.
जगातील सर्वात प्रदूषित शहरे
१. लाहोर (पाकिस्तान)
२. मुंबई (भारत)
३. काबूल (अफगाणिस्तान)
४. काओशुंग (तैवान)
५. बिश्केक (किर्गिस्तान)
६. अक्रा (घाना)
७. क्राको (पोलॅंड)
८. दोहा (कतार)
९. अस्ताना (कझाकिस्तान)
१०. सॅटियागो (चिली)
मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसवण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बीएमसीला दिल्या आहेत.
उपाययोजनांचा अभाव
मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना अशा आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.