- डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री
आरोग्यसेवा क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांचे जटिल आणि बदलते स्वरूप बघता, अनेकदा असे दिसून येते की, या आव्हानांचा सामना प्रत्येक देशाने वैयक्तिकपणे करण्याऐवजी संपूर्ण जगाने एकत्र येऊन केला, तर ते अधिक परिणामकारक ठरेल. महामारीच्या आपल्या जागतिक अनुभवाने हे सिद्ध केले आहे की, जेव्हा आरोग्य विषयक आणीबाणीचा सामना करावा लागतो, तेव्हा नवीन रोगासाठी लस विकसित करायला शास्त्रज्ञ, विविध देशांची सरकारे, खासगी क्षेत्र-मोठ्या कंपन्या तसेच स्टार्ट-अप्स, नियामक, विविध देशांतील राजकीय नेते, यांना लवकर एकत्र यावे लागते आणि एकत्रितपणे अखंड काम करावे लागते. पुरेसा लस-साठा आपल्याकडे असला, तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ही जीवन-रक्षक लस उपलब्ध होतेच असे नाही, हेदेखील सिद्ध झाले आहे.
उत्तमरीतीने जोडल्या गेलेल्या आजच्या जगात, अत्यंत जलद गतीने प्रसार होणाऱ्या विषाणूची साथ आल्यावर, काही देशांमधील जनतेचे प्राण वाचवले, तर साथीमुळे होणाऱ्या हानीला थोडा विलंब होऊ शकतो, पण ती पूर्णपणे रोखता येत नाही. अलीकडच्या काळात प्राप्त झालेल्या या अनुभवाच्या आधारावर, जगाने एकत्र येऊन आरोग्य सेवा मॉडेलवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. आज आपल्याला मजबूत आणि कार्यक्षम जागतिक आरोग्य संरचनेची गरज आहे. एखाद्या भागातील महामारीचा उद्रेक, महामारीचे प्रमाण गृहीत न धरता, त्या विशिष्ट प्रदेशातच रोखण्यामध्ये ही आरोग्य संरचना सक्षम असायला हवी. जागतिक आरोग्य प्रणालीकडे आरोग्याबाबतच्या पुढील आणीबाणी पूर्वी, विविध देशांच्या संपन्नतेची पातळी नाही, तर त्यांची गरज लक्षात घेऊन लक्षित रोगावरील लस, औषधे आणि निदान चाचण्या विकसित करणे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी स्पष्ट आदेश, क्षमता आणि उत्तरदायित्व असायला हवे.
कोविड-पलीकडील आरोग्य सेवेला चालना
वैचारिक पातळीवर २०२० मध्ये जेव्हा अॅक्सेस टू कोविड-१९ टूल्स एक्सीलरेटर (ACT- Accelerator) सहयोग ही संकल्पना मांडण्यात आली आणि साथीच्या रोगावरील प्रभावी उपाययोजना तयार करण्यासाठी काम केले, त्यावेळी आपण या आजारावरील जागतिक उपायांच्या जवळ पोहोचलो. एक व्यासपीठ म्हणून त्याने जगातील सरकारे, शास्त्रज्ञ, व्यवसाय, स्वयंसेवी संस्था आणि परोपकारी व्यक्तींना एकत्र आणले. ज्यायोगे, कोविड-१९ साठी चाचण्या आणि उपचार विकसित केले जातील, उत्पादित केले जातील आणि ज्यांना त्याची गरज आहे, त्यांना त्याचे समान वाटप होईल. यासारखी अधिक आव्हाने हाताळण्यासाठी आणि त्यावर आणखी चांगल्या उपाययोजना करण्यासाठी या चालना देणाऱ्या घटकांच्या रूपरेषेचा पुनर्विचार करण्याची आज गरज आहे. कोविड-१९ ही जगातील शेवटची महामारी नसून, त्या पलीकडील आव्हाने हाताळण्यासाठी, आरोग्य सेवेला चालना देणारे असे घटक, तसेच सुशासन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी जलद प्रतिसाद देणारी जागतिक प्रणाली आणि कार्यक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. जगातील पुढील आरोग्य विषयक आणीबाणी ही, प्रतिजैविक प्रतिकार, आणखी एखाद्या विषाणूचा उद्रेक किंवा पूर्णपणे अनपेक्षित काही तरी यापैकी आपल्याला माहीत असलेल्या आरोग्य संकटांपैकी एक असू शकते. पण जागतिक स्तरावरील परिभाषित चौकट, मॉक- ड्रिल्सचा (सराव-कवायती) अनुभव, तसेच स्थानिक पातळीवर अशा आरोग्यविषयक आव्हानांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आपल्याला जागतिक आरोग्य संरचना सुधारण्यासाठी मोलाचा अनुभव देईल.
रोग निदान, उपचार, लसी आणि आरोग्य प्रणाली हे ACT- एक्सीलरेटर चे चार आधारस्तंभ आहेत. आतापर्यंतच्या उपायांना किती यश मिळाले आणि यामध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, हे जाणून घेण्यासाठीचा प्रारंभ बिंदू आहेत. अशा प्रकारच्या पहिल्या जागतिक संरचनेने, विविध प्रकारच्या भागधारकांना एकत्र आणून जलद गतीने कशी सेवा पुरवली, यावर व्यापक स्तरावरील एकमत असले तरी, यामधील बरीचशी कृती ही ऐच्छिक होती आणि तिला औपचारिक संरचनेच्या बळाचा आधार नव्हता. जागतिक आरोग्य सेवेला चालना देणाऱ्या सध्याच्या घटकांची व्याप्ती नव्याने परिभाषित करण्याची गरज स्पष्ट आहे आणि या घटकांच्या अलीकडील मूल्यमापनाच्या आधारे ते अधिक प्रभावी ठरावेत, यासाठी जगात ज्या ठिकाणी त्याची अधिक गरज आहे, तेथे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करायला हवा.
ऑक्टोबर २०२२ मधील ACT-एक्सीलरेटरच्या स्वतंत्र मूल्यांकनात असे दिसून आले की, मध्यम आणि अल्प-उत्पन्न गटातील देशांच्या प्रतिनिधींनी लस, औषधे, रोग निदान किट्स विकसित करणे, तयार करणे आणि त्याची खरेदी करण्यामधील आपली कमतरता ओळखली, त्यांना वाटले की आपला आवाज कोणीच ऐकत नाही आणि निर्णय प्रक्रियेत आपला गांभीर्याने विचार केला जात नाही. अशा वेळी त्यांना एक्सीलरेटर (आरोग्य सेवांना चालना देणारे घटक)ने दिलेला आदेश अत्यंत समर्पक वाटला. या मूल्यमापनाचे तात्पर्य म्हणजे, आरोग्यविषयक आव्हानांपुढे प्रतिसादाच्या परिणामकारकतेशी तडजोड केली गेली. जागतिक आरोग्य सेवेला चालना देणाऱ्या घटकांना (प्रवेगक) अधिक औपचारिक स्वरूप, आकार, स्पष्ट उत्तरदायित्व आणि संपूर्ण पारदर्शकतेसह प्रशासन संरचना असेल, तर ते पुढील आरोग्य विषयक आणीबाणीच्या आव्हानांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकेल. असे कायमस्वरूपी संस्थात्मक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आणि आपल्या नवीन अवताराची (स्वरूपाची) अधिक मजबूत प्रशासन आणि उत्तरदायित्वासह आरोग्यसेवेवरील विस्तारित व्याप्ती कशी असू शकते यावर विचार करण्यासाठी नुकतेच जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारणारा भारत सदस्य देशांमध्ये एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. साथीच्या आजाराने आपल्याला याची देखील जाणीव करून दिली की, ग्लोबल साऊथमधील अनेक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना आपल्या जनतेचे संरक्षण करण्यासाठी फारच कमी साधनांसह स्वत:चा बचाव करावा लागला. या अनुभवाने आपल्याला स्थानिक पातळीवर क्षमता विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्गांच्या गरजेचा पुनर्विचार करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. या क्षमतांच्या मदतीने आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात तिथल्या जनतेला वेळेवर रोगनिदान, लस आणि औषधे या सुविधा सुनिश्चित होतील आणि त्यामुळे अनेक जीव आणि अर्थव्यवस्थांचे संरक्षण होईल. पुढील जागतिक आरोग्य संरचनेचा आराखडा निश्चित करताना आपल्याला, जागतिक समुदायाला या गोष्टीची खात्री करावी लागेल की, या सेवांचा समान लाभ घेणाऱ्या असुरक्षित अल्प-उत्पन्न देशांच्या गरजा आणि संदर्भ लक्षात घेतले जातील व त्याची पुरेशी पूर्तता केली जाईल. जेणेकरून, भविष्यातील साथीच्या रोगांचे सुसूत्रतेने व्यवस्थापन करण्यासाठी जग अधिक सुसज्ज राहील व यासाठी सर्वजण पुढाकार घेतील.
या उपक्रमासाठी जगभरातील नेत्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा उपयोग करण्याबरोबरच, यापुढील आरोग्यविषयक आणीबाणीचा सामना करण्यासाठी जगभरात लस-उपचार पद्धती-रोग निदान यासाठीचे जाळे मजबूत करण्याबाबत व्यापक विचार होणे आवश्यक आहे. भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांवर जागतिक स्तरावर एकत्र येऊन उपाययोजना करता याव्यात, यासाठी वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशात अशा प्रादेशिक संशोधन आणि उत्पादन क्षमतांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. गेल्या तीन वर्षांत आपण पाहिले की कंपन्यांकडे क्षमता असतानाही, या कंपन्या जगाच्या इतर भागांमध्ये आणि काही वेळा त्यांच्या स्वत:च्या देशातही आवश्यक उत्पादने नेहमीच वितरीत करू शकल्या नाहीत, कारण काही वेळा काही वैद्यकीय उत्पादनांची मागणी अनपेक्षित किंवा अनपेक्षित होती. इतर वेळी उत्पादनात वाढ करणे आव्हानात्मक होते; तर कधी पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. तसेच संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान सामर्थ्य तीव्र स्वरूपात एकाच ठिकाणी केंद्रित झाले आणि काही देश आवश्यक वैद्यकीय उपकरणांचे वितरण विशेषतः अल्प आणि मध्यम-उत्पन्न देशांना करू शकले नाहीत. या नेटवर्क्सच्या सहाय्याने चाचण्या आणि उपचार विकसित केले गेले की, ते सर्व देशांपर्यंत समान प्रमाणात कमी कालावधीत पोहोचतील, याची खात्री करण्याची जबाबदारी जागतिक नेतृत्वाची आहे आणि म्हणूनच भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात जागतिक वैद्यकीय प्रतिकार प्रणालीच्या समन्वय मंचाची भूमिका आपण निश्चित केली पाहिजे.
जागतिक राजकीय इच्छा आणि कृती
आज जागतिक आरोग्य सेवेसमोरची अनेक आव्हाने, मग ती प्रतिजैविक प्रतिकार असोत किंवा कोविड-१९चे नवीन स्ट्रॅन्स (उत्परिवर्तित रूप) असोत, जगातील कितीही साधनसंपत्तीने संपन्न देश असला, तरी कोणत्याही एका देशाला एकट्याने त्यावर उपाययोजना करता येणे शक्य नाही, एवढी ती जटिल आहेत. या आव्हानांवर कोणतेही एक क्षेत्र, मग ते कितीही कार्यक्षम असले, तरी उपाययोजना करू शकत नाहीत. त्यासाठी आंतरदेशीय आणि बहुक्षेत्रीय-भागीदारीचे मॉडेल विकसित करणे आवश्यक आहे, ज्याचे नेतृत्व देश आणि विविध क्षेत्रांतील जागतिक नेते करतील. कोविड-१९ दरम्यान सहकार्याचे अभूतपूर्व मॉडेल असूनही, जगातील सर्व देशांचा यामधील सहभाग वाढवायला व त्यांना एकाच छत्राखाली आणायला आणखी वाव आहे. आरोग्यविषयक संरचनेच्या भविष्यातील आवृत्तीमध्ये विविध सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था, परोपकारी आणि खासगी क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी मॉडेल असायला हवे, ज्यायोगे प्रत्येक क्षेत्राच्या क्षमतेचा लाभ घेत अखंड कार्यरत राहणे, हेच प्रमाण होईल. आज संशोधन व उत्पादन नेटवर्कसह जागतिक आरोग्य सेवांना चालना देणारे घटक या संकल्पनेला नवसंजीवनी दिल्याने, आरोग्यविषयक पुढील आणीबाणी हाताळण्यासाठी व्यवस्थापन प्रणाली आणि उपाययोजनांचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा लागणार नाही.