मुंबई (वार्ताहर) : मुंबई शरीरसौष्ठवातील ज्युनियर्ससाठी स्फूर्तीदायक असलेल्या ज्युनियर मुंबई ‘श्री’ स्पर्धेत भारत हेल्थ स्पाच्या हर्ष गुप्ताने आकर्षक पीळदार देहयष्टी आणि लक्षवेधी पोझेस मारून अजिंक्यपद पटकावले. मास्टर्स गटात अमित सिंग (४० ते ५० वर्षे), संजय माडगावकर (५० ते ६० वर्षे) आणि प्रमोद जाधव (६० वर्षांवरील) यांनी बाजी मारली. ज्युनियर मेन्स फिजीकच्या गटात शिकाप बेग आणि सोहैल इद्रिसी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत जेतेपदाला गवसणी घातली. ज्युनियर मुंबई श्रीमध्ये सुमारे १६५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
ज्युनियर मुंबई ‘श्री’च्या मंचावर मास्टर्स खेळाडूंनी अक्षरश: धम्माल उडवली. ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील अशा तिन्ही गटात सुमारे ४८ खेळाडू उतरल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांची पीळदार देहयष्टी पाहून उपस्थितांनीही मनमुराद दाद दिली. ज्युनियर मुंबई ‘श्री’ आणि मास्टर्स स्पर्धेसोबतच दिव्यांगांचीही स्पर्धा पार पडली. केवळ एका गटात झालेल्या स्पर्धेत वर्ल्डवाईड जिमचा महबूब शेख पहिला आला.