Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडीपालघर

बँकांनी जप्त केलेली घरे स्वस्तात देतो सांगून कोट्यवधींची फसवणूक

बँकांनी जप्त केलेली घरे स्वस्तात देतो सांगून कोट्यवधींची फसवणूक

वसई : घरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकजण स्वस्त घर कुठे मिळेल का, या शोधात असतात. अशाच नागरिकांचा गैरफायदा घेत त्यांना बँकांनी सील केलेली घरे स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वसई येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी सापळा रचून फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. विशेष म्हणजे या टोळीत वकीलांचाही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


या टोळीने मुंबई, ठाण्यासह वसई- विरारमध्ये तब्बल १५७ लोकांची ३ कोटी ७५ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.


परवेझ दस्तगिर शेख उर्फ राहुल भट उर्फ पीटर सिक्वेरा उर्फ असिफ सय्यद (वय ३१), सोहेब हुसेन शेख उर्फ नितीन शर्मा उर्फ प्रशांत बन्सल उर्फ सोहेल शेख (वय २८), प्रवीण मल्हारी ननावरे आणि हिना इकबाल चुडेसरा उर्फ हिना सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर घेण्याच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना या टोळीने हेरून ही मोठी फसवणूक केली आहे. तब्बल १५७ नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. या टोळीत दोन वकील असून आरोपींनी वेगवेगळ्या बोगस कंपन्या स्थापन करुन, बँक लिलावातील स्वस्त दरात प्लॅट उपलब्ध असल्याची खोटी जाहिरात दिली. ही जाहिरात पाहून नागरिक त्यांच्याकडे आले आणि त्यांची फसवणूक करण्यात आली.


आरोपींनी विनर्स बिल्डर्स ही कंपनी स्थापन केली होती. त्यांनी गेल्या जून २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता, घरे तडजोड करून विक्री करणार असल्याचे सांगितले. याला तब्बल ४४ नागरिक बळी पडले. त्यांची ८० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. यातील फसवणूक झालेल्या पियुषकुमार दिवाण या व्यक्तीने गेल्या वर्षी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.


त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे ओळख बदलून नागरिकांची फसवणूक करत होते. आरोपी सोहेब आणि परवेज हे वकील असून ठाणे आणि मुंबईतील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा त्यांनी घातल्याचे उघड झाले आहे.

Comments
Add Comment