मुंबई: मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला ऑटोरिक्षात आरडीएक्स असल्याची फेक माहिती देणारा कॉल केल्याप्रकरणी सूरज जाधव नावाच्या एका व्यक्तीला बोरिवली येथून अटक करण्यात आली. जाधव यांच्यावर यापूर्वी खून व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरीवली पोलिसांना मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन आला. फोनवर माहिती देण्यात आली की, काही वेळापूर्वी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा पकडली आहे. त्या रिक्षात अगोदरच दोघेजण बसले होते. मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा सुरु असून या तिघांनी ती रिक्षा गोविंदनगर बोरीवली पश्चिम येथे सोडल्याचे या व्यक्तीने सांगितले.
फोन करणारा आणि त्या रिक्षाचा शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये यांच्या नेतृत्वाखाली एटीसी पथकाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर, इंद्रजित पाटील यांच्या पथकाने गोविंद नगर परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तपास सुरु असतानाच त्या कॉलरने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करुन कळवले की, रिक्षामध्ये बसून दोघेजण हल्ला करण्याची चर्चा करत होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे कॉल करणाऱ्या व्यक्तीला एक्सर डोंगरी परिसरातील घरातून छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्या फोनची तपासणी केली असता हे फोन त्या व्यक्तीनेच केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या आरोपीवर मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. वाकोला पोलीस ठाणे हद्दीत त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. बोरिवली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.