ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर काल प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी माध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाण केली. ठाणे मनपामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले महेश आहेर हे कामकाज संपल्यानंतर घरी निघाले होते. त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.
नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा यांनी सुद्धा नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा आवाज असल्याचा आरोप आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा पालिका अधिकारी अशी महेश आहेर यांची ओळख आहे. त्यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला होता. बाबाजी म्हणजेच सुभाषसिंग ठाकूर टोळीचा शूटर श्यामकिशोर गरिकापट्टीच्या माध्यमातून महेश आहेर लोकांना धमकावण्याचे काम करतात असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. याच शूटरच्या माध्यमातून आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना मारण्यासाठी महेश आहेर हे एका व्यक्तीशी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.