Sunday, February 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणराज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार

वेंगुर्ले येथील १७ व्या त्रैवार्षिक महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार तसेच शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
शिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही आणि टाकू देणार नाही. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुजनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच समिती बरोबर एक बैठक घेऊन सगळ्यात प्रश्नाबाबत चर्चा करू असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगले घेऊन जाल. जसे डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. शिक्षकांचे समाजामध्ये फार मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम आपण करत आहात. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरून शाळेत लवकर पोहोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत.

मी आणि उपमुख्यमंत्री मिळून या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचं हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले असून राज्यातील घटकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले असल्याचे शिंदे म्हणाले.

नविन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले. यावेळी राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -