कल्याण: डोंबिवली एमआयडीसी भागात कल्याण शीळ रोडवरील दावडी नाक्याजवळील श्रेया हॉटेल समोर आज पहाटे पासून मोठ्या पाइपलाइनवर व्हॉल्व मधून गळती सुरु आहे. याआधीही एमआयडीसी पाण्याच्या पाइपलाइन मधून अशा गळती सुरुच असतात. नागरिकांनी याबाबत एमआयडीसी कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करुनही यावर अद्याप ठोस उपायोजना होत नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
या पाइपलाइन व्हॉल्व मधून गळती बंद व्हावी या उद्देशाने अनेक चांगल्या सूचना एमआयडीसी प्रशासनाकडे येथील जागरूक नागरिकांनी केल्या आहेत. त्यात या पाइपलाइन व्हॉल्व वर लोखंडी जाळीदार बॉक्स बनविणे ही मुख्य आहे. दरम्यान, असे जाळीदार बॉक्स मुंबई महापालिकेने त्यांचा पाइपलाइनवर बसविले आहेत.
तसेच या पाइपलाइनवर ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशीही सुचना या नागरिकांनी केली होती. तरीही यापैकी एकाही सूचनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे एमआयडीसीने या उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.