मुंबई: दहावी आणि बारावीच्या परिक्षेत कॉपी होऊ नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत असतानाच आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी मान्य करुन आता परिक्षेची वेळ दहा मिनिटांनी वाढवण्यात आली आहे.
याची माहिती देणारे सुधारित वेळापत्रक बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहे. त्यानुसार सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात सध्याच्या वेळेमध्ये पेपर संपल्यानंतर अधिक दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
दरम्यान, दहावी बारावीच्या परिक्षांच्या वेळी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला होता. त्यामुळे किमान पेपर पूर्ण झाल्यानंतर तरी दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून केली जात होती. बोर्डाने ही मागणी मान्य करत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा दिला आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या दोन वर्षांनंतर ही परिक्षा पहिल्यांदा ऑफलाईन होत आहे.