सातारा : सातारा शहरात सातवी इयत्तेत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेळण्या बागडण्याचा वय असलेल्या पीडित मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर २०२२ मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्याशी संबंध ठेवले होते. शाळकरी मुलीने झालेला प्रकार त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता. परंतू मासिक पाळी नियमित न आल्याने तिला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या मुलीची मासिक पाळी नियमित न आल्याने आई तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. तर या घटनेतील संबंधित मुलीला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती.