नवी दिल्ली : कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सक्रिय झाली असून एनआयएच्या पथकाने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील ६० ठिकाणी छापे टाकत कसून चौकशी सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित संशयितांना पकडण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी कोईम्बतूरच्या संगमेश्वर मंदिरासमोर कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात २५ वर्षीय जेमशा मुबीनचा मृत्यू झाला. जेमशा त्याच्या इतर साथीदारांसह दक्षिण भारतातील अनेक भागात बॉम्बस्फोटांचा कट रचत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांना जेमशाच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा सापडला होता. झडती दरम्यान कोईम्बतूर रेल्वे स्टेशन, शहर पोलीस आयुक्त कार्यालय, कोईम्बतूर जिल्हाधिकारी कार्यालय, रेसकोर्स आणि व्हिक्टोरिया हॉलचे नकाशेही सापडले. जेमशा आयसिसच्या संपर्कात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
तसेच कर्नाटकातील मंगळुरूमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑटो रिक्षात प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात आरोपी मोहम्मद शारिक हा जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी शारिक बराच काळ फरार होता.