मुंबई (प्रतिनिधी) : १८ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे जादा बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. ही वाढती गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे विशेष सेवा चालवली जाणार आहे. बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बसगाड्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानक) , बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल बस स्थानक) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) या तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालविण्यात येतील, असे बेस्टतर्फे सांगण्यात आले.
प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत बेस्टतर्फे विविध सण, उत्सव या कालावधीत विशेष बस सेवा चालवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीनिमित्त बेस्टतर्फे विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.