नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेली आजची सुनावणी संपली असून त्यावर उद्या म्हणजे बुधवारी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
आज दिवसभर सुमारे चार तास या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. आता यावर उद्या शिंदे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस या सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहेत.
विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे. त्यावर आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.
अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया प्रकरणावर पुन्हा एकदा मोठ्या घटनापीठाकडून पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तर यावर तशी काही गरज नसल्याचं शिंदे गटाचे वकील अॅड. हरिष साळवे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. या प्रकरणावर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार असून त्यावर उद्या किंवा परवा सुनावणी होण्याची शक्यता आहे.