माजी नगरसेविका हर्षदा गायकरसह युवती सेनेच्या अनेक महिलांचा शिंदे गटात प्रवेश
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ज्या ज्या वेळी नाशिक दौऱ्यावर येतात त्या त्या वेळी ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम शिंदे गटाने केले आहे. सत्तांतरानंतर संजय राऊत नाशिकमध्ये येण्याची चौथी वेळ असेल, यावेळी देखील काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राऊत नाशिकमध्ये येण्यापूर्वीच पुन्हा शिंदे गटाने करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातून इनकमिंग पेक्षा आऊटगोईंग अधिक होत असल्याचे चित्र आहे. अशातच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे वेळोवेळी नाशिक दौऱ्यावर येऊन ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना याउलट सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: उद्धव ठाकरे नाशिकला येऊन सभा घेणार होते. त्यासाठी संजय राऊत नाशिकला आले होते, मात्र तेव्हादेखील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली. आज पुन्हा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असताना ते येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे हे काही आज होत असे नाही. यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने शिंदे गटाने करेक्ट कार्यक्रम केला आहे. अशातच आज विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत काम करणारे संदीप गायकर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका हर्षदा गायकरसह युवती सेनेच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे नाशिकमध्ये संजय राऊत ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येत आहे. मात्र त्या आधीच ठाकरे गटात डॅमेजचा सिलसिला सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.