कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला लागूनच असलेले सुभाष मैदान व तेथील शौचालयाच्या झालेल्या दुरावस्थेकडे सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले असून लवकरात लवकर येथील डागडुजी करण्याची मागणी केली आहे.
सुभाष मैदान हे कल्याण शहरातील नावाजलेले मैदान आहे. तसेच ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य कार्यालयालगत आहे. हजारो लहान-मोठी मुले-मुली तिथे विविध खेळ खेळायला येतात. अनेक ज्येष्ठ नागरिक तिथे फिरायला व जॉगिंग करायला येतात. पण आज त्या मैदानाची अवस्था अत्यंत किळसवाणी झाली आहे. जिकडे बघावे तिकडे घाण असते, डीव्हाडर तुटलेले आहे, लोकांना चालताना नाक मुठीत घेऊन चालावे लागते. परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
शौचालयाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. त्याची संपूर्ण दुरावस्था झाली आहे. तरी याकडे केडीएमसी प्रशासनाने लक्ष घालून सुभाष मैदान चांगले व सुव्यस्थित करून द्यावे. सदर मैदान हे कल्याण शहरातील ह्रदय आहे, त्यामुळे ते घाणेरडे असल्यामुळे महापालिकेचे नाव खराब होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन या मैदानाची त्वरित डागडुजी करण्याची मागणी सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.